छत्रपती संभाजीनगर : दौलताबादच्या कसाबखेड्यात घातक रसायनांद्वारे सुगंधी तंबाखूचे उत्पादन करणारा कारखाना उघडण्यात आला होता. एनडीपीएस पथकाने सुगंधित तंबाखूची वाहतूक सुरू असलेला टेम्पो पकडल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. आमिर फरिद मेमन (रा. कटकट गेट) याने तो सुरू केला होता.
एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना दौलताबाद परिसरातून रोज सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी रात्री जांभळा गावात सापळा रचला. संशयित टेम्पोला थांबवल्यानंतर त्यात तंबाखू आढळून आली. चालक शेख हारुण शेख रहिम (रा. राहुलनगर) व त्याचा साथीदार मोहम्मद सिद्दीकी इमरान (रा. जहागीरदार कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी आमिर मेमनच्या कारखान्यातून हा माल घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने कारखान्यावर छापा टाकला.
घातक रसायनांचा वापरपत्र्याच्या शेडमध्ये उभारण्यात आलेल्या कारखान्यात घातक रसायनांचा वापर करून अत्यंत खराब तंबाखूला सुगंधित केले जात होते. तेथून जिल्ह्यासह शहरात त्याचा पुरवठा होताे. विशेष म्हणजे, कुठल्याही बिल, नोंदणीशिवाय हा सर्व व्यवहार चालतो. यात चालकांना अटक झाली. कारखान्यावर पोलिस आल्याचे कळताच मेमन मात्र पसार झाला. बागवडे यांच्यासह उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार सुनील बेलकर, लालखान पठाण, महेश उगले, सतीश जाधव, संदीप धर्मे यांनी कारवाई केली. कारखान्यातून १३० किलो सुंगंधित तंबाखू, ८६५ किलो साधी तंबाखू (कच्चा माल) व ११५ लिटर घातक रसायन पोलिसांनी जप्त केले.
म्हणून शहर पोलिसांच्या हद्दीतआमिर फरिद मेमनचे वडील महंमद फरिद यांच्यावर असे कारखान्याचे, गुटखा विक्रीचे अनेक गुन्हे आहेत. २०२४ मध्ये त्यांनी खुलताबादमध्ये मंगल कार्यालयात कारखाना उघडला होता. जिल्हा पोलिसांनी ऑगस्टमध्ये तेथे कारवाई करत लक्ष्य केल्याने फरिदने तो शहर पोलिसांच्या हद्दीत सुरू केला. यापूर्वी हर्सुल, दौलताबाद फार्म हाऊसमध्ये कारखाने उघडले होते. गुजरातमधून मालाचा पुरवठा होतो.