पिंप्री राजा (औरंगाबाद ) : प्रवासात अतिघाई जीवघेणी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचीच प्रचीती सोमवारी आडगाव येथे आली. लग्न समारंभासाठी एकाच गाडीवर जाणाऱ्या ४ भावंडाचा अपघात आडगावकडून पिंप्री राजाकडे येणाऱ्या रोडवर झाला. अनियंत्रित बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रक ट्रेलरला धडकल्याने दोघे जण ठार, तर दोघे जखमी झाल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्जुन बबन ठोंबरे व पवन राजेंद्र ठोंबरे अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा गोविंद ठोंबरे व आशुतोष अर्जुन ठोंबरे हे दोन तरुण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव येथील ठोंबरे कुटुंबातील चार युवक सोमवारी सायंकाळी एकाच बाईकवरून ( एमएच १९ एजे ६८६२ ) विवाह समारंभासाठी जात होते. गावापासून थोड्या अंतरावर पिंप्री राजा रोडवर एक ट्रक ट्रेलर (एमएच ०४ ईवाय २३०७) रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने बाईक थेट ट्रकच्या पाठीमागील भागात घुसली. या भीषण अपघातात बाईकवरील चारही जणांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी विदारक चित्र होते.
अपघातग्रस्त वाहन पाहताच ग्रामस्थांनी लागलीच मदतकार्य केले. गंभीर जखमी चौघांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून अर्जुन व पवन यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी कृष्णा व आशुतोष यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांवर मंगळवारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन तरुण मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती. दरम्यान, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.