परभणी : रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करुन रेल्वे वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या मुंबई- लातूर रेल्वेचा नांदेडपर्यंतचा विस्तार रद्द करण्यात आला आहे. रेल्वे बोर्ड दिल्लीच्या आदेशावरुन सदर रेल्वेचा विस्तार रद्द करण्यात येत असल्याबाबतचा मध्य विभाग रेल्वेचे अतिरिक्त परिचालक प्रबंध ब्रिजेश रॉय यांनी मराठवाडा रेल्वे संघटनेला माहिती दिली.मराठवाडा विभागातील प्रवाशांच्या विरोधातील या निर्णयाचा निषेध करुन विरोध नोंदविण्यासाठी २ जुलै रोजी मुंबई येथे मराठवाडा रेल्वे संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ या मागणीसोबत मराठवाडा विभागासाठी नवीन स्वतंत्र झोन, विभागातील प्रवाशांना हवा असलेला पुणे - मुंबई इत्यादी गाड्यांची सुविधा, परळी-बीड-नगर, सोलापूर-बीड-जळगाव, रोटेगाव-पुणतंबा, पुणे-औरंगाबाद-शेगाव आणि पानगाव-लातूर-गुलबर्गा नवीन रेल्वे मार्गाचे निर्माण़ मनमाड-परभणी-मुदखेड मार्गाचे दुहेरीकरण, अकोला-खंडवा मार्गाचे ब्रॉडग्रेजमध्ये परिवर्तन, प्रवासी सुरक्षा, गाड्यांचा लूज टाईम रद्द करून वेग वाढविणे, नांदेड-संत्राग रेल्वेचा विस्तार मुंबईहून हावडापर्यंत्त दोन्ही बाजूने विस्तार करणे, महत्त्वपूर्ण स्थानकांवर एक्सप्रेस थांबा मिळविणे, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा केंद्रांना रेल्वेने संपर्क जोडणे, नांदेड- औरंगाबाद दरम्यान लोकल सुविधा देण्यात यावी, पंढरपूर रेल्वेला स्लिपर सुविधा द्या, परळी ते लातूर रोड रेल्वे मार्गाला नांदेड विभागात समाविष्ट करावे, यासह इतर मागण्यांसाठी २ जुलै रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक प्रभाकर वाईकर, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, डॉ. राजगोपाल कालानी, प्रवीण थानवी, कृष्णा अग्रवाल, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित, चंदूलाल बियाणी, जुगलकिशोर लोहिया, गणपतअप्पा सौंदळे, नवीनकुमार चोकडा, दीपक कुल्थे आदींनी केले आहे.(प्रतिनिधी)
मुंबई-लातूर रेल्वेचा विस्तार रद्द
By admin | Updated: June 23, 2014 00:18 IST