गंगापूर/ बिडकीन : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गंगापूर-जामगाव मार्गावर गणपती बारव मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. दुसऱ्या घटनेत एका उभ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना पैठण रोडवरील बिडकीन येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. उत्तमराव नामदेव ठोंबरे (वय ७० वर्षे, रा. जामगाव) व संतोष गंगाधर कातारे (वय ४५, रा. नवीन कावसान पैठण) अशी मयतांची नावे आहेत.
जामगाव येथील उत्तम ठोंबरे हे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवर (एमएच २० - अेएन ४१९७) गावाकडे जात असताना दुसऱ्या एका दुचाकीवर (एमएच २० - अेयू २६०६) युवराज दगडू चुंगडे (वय १३, रा. कोबापूर) व सुनील रमेश साळुंखे (वय १७, रा. गंगापूर) हे दोघे गंगापूरकडे येताना गणपती बारव परिसरात ट्रॅक्टरला मागे टाकण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीवरील उत्तमराव नामदेव ठोंबरे, युवराज चुंगडे व सुनील साळुंखे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. सूर्यवंशी यांनी उत्तम ठोंबरे यांना तपासून मृत घोषित केले तर युवराज चुंगडे व सुनील साळुंखे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले.
मयत उत्तम ठोंबरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे. या घटनेची नोंद गंगापूर पोलिसात करण्यात आली आहे. अधिक तपास पो.ह. विजय पाखरे हे करीत आहेत.