खुलताबाद: वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थान परिसर तसेच जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील विकास काम करण्यासंदर्भात मंदीर व लेणी परिसरातील झालेले अतिक्रमण लवकरच हटविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ११ जुलै रोजी दिलेल्या पत्रानुसार नाशिक येथे कुंभमेळा भरणार असून त्यासाठी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थानच्या दर्शनासाठी ५ ते १० लाख भाविकांची गर्दी अपेक्षित धरता या परिसरातील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी सर्व संबंधित विभागप्रमुखांना या संबंधित प्रारूप आराखडा तयार करून नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
श्री घृष्णेश्वर मंदिर समोरील व परिसरातील अतिक्रमण , त्याचबरोबर सोलापूर- धुळे महामार्ग ते वेरूळ मंदीर रस्त्यावरील अतिक्रमण, दौलताबाद टी पॉईंट ते वेरूळ मंदीरापर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी आज बुधवारी खुलताबाद तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीस तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता दिलीप कोलते, उपअधीक्षक भूमी अभिलेख सेवक, श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे, सरपंच कुसूमबाई मिसाळ आदीसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.