छत्रपती संभाजीनगर : सुखना नदीचा उगम सावंगी गावाजळील डोंगरातून होतो. अगोदर नदीपात्र वाळूमाफियांनी पोखरले. त्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी पात्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण केले. नदीचे पात्र कुठे ६५, तर कुठे १५० फूट रुंद आहे. मुळात नदीचे पात्र किमान २५० ते ३०० फूट रुंद हवे. पात्राचा अतिक्रमणांनी गळा घोटल्याने मागील पाच वर्षांमध्ये तिसऱ्यांदा पात्राच्या आसपास असलेल्या असंख्य वसाहती पाण्यात बुडाल्या.
महापालिकेने मागील पाच वर्षांत खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून दिले. सीएसआर फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून नदीपात्र स्वच्छ व सुंदर केले. याच पद्धतीने सुखना नदीचा कायापालट करण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले. मागील काही दिवसांत चिकलठाणा येथील बाजाराच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यातील गाळ काढला. सुखना पात्र मोठे केले. पात्रातील अनेक वर्षांची घाण, बाभळीची किमान २ हजार झाडे काढली. त्यामुळे गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका चिकलठाण्याच्या वरील वसाहतींना सर्वाधिक बसला. कारण सुखना पात्राची अवस्था.
सावंगी, हर्सूल, नारेगाव, ब्रिजवाडी, सिंधीबन, चौधरी कॉलनी आदी भागांतून सुखना नदीचे पात्र जाते. या पात्रात अतिक्रमणे प्रचंड झाली. कोणी घरे बांधली, कोणी शेती करू लागले, कोणी वाळू उपसा करू लागले. पात्राची अत्यंत दयनीय अवस्था करून ठेवल्याचे सूत्रांनी नमूद केले. महापालिकेने कठोर भूमिका घेऊन पात्रातील अतिक्रमणे काढावीत. पात्र किमान २५० ते ३०० फूट रुंद करावे. तीन वर्षांपूर्वी नारेगाव भागात अतिवृष्टीनंतर अशाच पद्धतीने हाहाकार उडाला होता. नागरी वसाहती सुरक्षित ठेवायच्या असतील तर पात्राला गतवैभव मिळवून देणे गरजेचे आहे.