पैठण : तालुक्यातील जायकवाडी येथे जायकवाडी पाटबंधारे विभागाने सोमवारी सकाळी ११ वाजता बाजार तळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली असता, या मोहिमेला हिंसक वळण लागले. संतप्त अतिक्रमणधारक आणि ग्रामस्थांनी या मोहिमेला विरोध केल्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने काही आंदोलकांनी जेसीबीवर दगडफेक केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
पाटबंधारे विभागाने जायकवाडी येथील सरकारी निवासस्थाने पाडल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता बाजार तळ परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पथक पोलिस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचले. यावेळी कारवाईला विरोध करीत उपस्थित ग्रामस्थांनी पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर ठिय्या मांडला. काही आंदोलकांनी जेसीबीवर दगडफेक केल्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी तत्काळ परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र, सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम बंद होती. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, सपोनि ईश्वर जगदाळे, नायब तहसीलदार राहुल बनसोड, माजी आमदार संजय वाघचौरे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांची आक्रमक भूमिका; आज पुन्हा अधिकाऱ्यांची बैठकआंदोलकांनी 'राहुलनगर' येथील घरे आपली हक्काची असल्याचे सांगत ती ५० वर्षांपासूनची वस्ती आहे. घरकुल योजनेचा निधी येथे खर्च झाला असल्याने ती 'अतिक्रमणे' नाहीत, असा दावा केला. येथील ग्रामस्थ सदानंद खडसन म्हणाले, आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमची घरे पाडू देणार नाही. दरम्यान, गावातील तणाव निवळण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दिवसभर ग्रामस्थांसोबत चर्चा सुरू होती. यासंदर्भात मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
Web Summary : Encroachment removal in Jaikwadi turned violent after residents protested, leading to stone pelting. Police used mild force to control the situation. Tensions remain high, and discussions are ongoing to resolve the issue. The removal drive is currently halted.
Web Summary : जायकवाड़ी में अतिक्रमण हटाने के दौरान निवासियों के विरोध के बाद हिंसा हुई, जिसमें पथराव हुआ। स्थिति को नियंत्रित करने के लिए पुलिस ने हल्का बल प्रयोग किया। तनाव अभी भी बना हुआ है और मुद्दे को हल करने के लिए बातचीत जारी है। अतिक्रमण हटाने का अभियान फिलहाल रोक दिया गया है।