लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे संपत्तीवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले असले तरी अद्यापपर्यंत याची माहिती वरिष्ठांना दिलेली नाही. परंतु रेल्वे हद्दीत केलेल्या अतिक्रमणधारकांवर रेल्वे विभागाकडून निश्चितच कडक कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य विभागीय अधिकारी नेहा रत्नाकर यांनी बुधवारी रेल्वेस्थानकातील स्वच्छतेची पाहणी करताना दिली. हिंगोली रेल्वेस्थानकांची बुधवारी वरिष्ठ वाणिज्य विभागीय अधिकारी रत्नाकर यांनी रेल्वेस्थानकातील स्वच्छतेची अतिशय बारकाईने पाहणी केली. एवढेच काय तर स्थानकात असलेली जुनी कपाटेदेखील उघडून पाहिली. शिवाय रेल्वेस्थानक परिसरातील घाणीचीही पाहणी करुन स्वच्छ करण्याच्या सूचना रेल्वेस्टेशन मास्तरांना दिल्या. तसेच स्थानकावर असलेल्या कॅन्टिनच्या खाद्यपदार्थांची व थंडपेयासह दुधाची आणि आईस्क्रीमचीदेखील पाहणी करुन पिण्याच्या बॉटलचे १५ रुपये असे भावफलक मोठ्या अक्षरात लावावे तसेच जुने झालेले भावफलक काढून नवीन बसविल्यानंतर व्हॉट्स अॅपला टाकण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच प्रवाशांची जराही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगितले. तर प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केलेल्या शौचालयाच्या पाहणीत स्वच्छताच दिसून न आल्याने रत्नाकार कामगारांवर भडकल्या. तसेच प्रतीक्षालयातील खिडक्यांचे फुटलेले काच आणि छताला लागलेले जाळेही काढण्याच्या सूचना दिल्या. तर सफाई कामगार महिलांशीही चर्चा केली. त्यांनी वेतन कमी असल्याचा मुद्दा सांगितल्यावर वेतनवाढीचा विचार केला जाईल, असेही सांगितले. तर प्रतीक्षालयातील खुर्च्याही वाढविण्यात येणार आहेत. तसेच रेल्वेही राष्ट्राची संपत्ती असल्याने या सेवेचा प्रवाशांनी उपयोग चांगल्या प्रकारे करावा. प्रवाशांची जराही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तसेच तिकिट काढूनच रेल्वेचा वापर करावा व रेल्वे परिसरात धूम्रपान टाळण्याचे आवाहन केले. पाहणीत दिलेल्या सूचनेमुळे स्थानकाचा खरोखरच कायापालट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
रेल्वे संपत्तीवर अतिक्रमण; कारवाई करणार
By admin | Updated: July 13, 2017 00:20 IST