विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मिळाले सशक्त व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:05 AM2018-01-23T01:05:55+5:302018-01-23T01:07:17+5:30

मुलांना थोडेसे मार्गदर्शन मिळाले, तर त्यांच्यातील सुप्त कलागुण उमलून कसा कलाविष्कार घडवितात, याचे प्रात्यक्षिक लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आयोजित जानेवारी इंटरस्कूल चॅम्पियनशिप २०१८ या उपक्रमात दिसून आले

Empowering platforms for children's creativity | विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मिळाले सशक्त व्यासपीठ

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मिळाले सशक्त व्यासपीठ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुलांना थोडेसे मार्गदर्शन मिळाले, तर त्यांच्यातील सुप्त कलागुण उमलून कसा कलाविष्कार घडवितात, याचे प्रात्यक्षिक लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आयोजित जानेवारी इंटरस्कूल चॅम्पियनशिप २०१८ या उपक्रमात दिसून आले. सोमवार (दि. २२) पासून लोकमत भवनात या स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला सशक्त व्यासपीठच मिळाले.
तीस शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुतळी आर्ट ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये बॉटल व सुतळी यापासून विद्यार्थ्यांना कलात्मक गोष्टी बनवायच्या होत्या. इयत्ता तिसरी व चौथीसाठी मास्क व कॅप क्राफ्ट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहायला मिळाले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी टी- शर्ट पेंटिंग स्पर्धेत त्यांचे कलागुण दाखविले. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोझाईक आर्ट, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टँडी डिझाईन स्पर्धा घेण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये उत्तम कलाविष्कार करून विद्यार्थ्यांनी परीक्षकांची दाद मिळविली. प्रकाश पवार, रचना सोनी, पैठणकर, रेखा जाखेते, ज्योती चोटलाणी यांनी विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.
मंगळवार, दि. २३ रोजी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे रंगमंचीय सादरीकरण होणार आहे. लोकमत हॉल येथे दु. ३.३० वा. या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सादरीकरणासाठी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांना विविध थीम देण्यात आल्या आहेत.

Web Title: Empowering platforms for children's creativity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.