जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्डयांमुळे मालवाहतुकीस अडचण होत आहे.छोटे-मोठे दीडशे कारखाने असलेल्या या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतून दररोज कोट्यवधी रूपयांच्या मालाची वाहतूक होते. येथील माल देशातील विविध प्रांतात तसेच काही विदेशातही जातो. परंतु गेल्या पाच वर्षांपासून या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.खराब रस्त्यांमुळे मालाची ने-आण करताना वाहनांचे सुटे भाग निखळतात. तर कधी मालही वाहनाबाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयापासून ते जलकुंभापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दाणादाण झाली आहे. तर कुरूंदेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. जालना-औरंगाबाद मार्गाशेजारील डी-ब्लॉग रस्त्यावरही जागोजागी खड्डे आहेत. सतत वाहतूक आणि या खड्डयांमुळे धुळीचे प्रमाणही वाढले. त्याचा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अजय किंगरे यांच्याशी संपर्क साधला असता या भागात ५ कि़मी. अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. तुर्तास या रस्त्यांच्या बाजूच्या नाल्यांचे काम सुरू असून ते संपल्यावर रस्त्याच्या कामास सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. (समाप्त)
एमआयडीसीतील खड्ड्यांमुळे ट्रकचालक त्रस्त
By admin | Updated: February 4, 2015 00:39 IST