जोरदार पावसामुळे पडझड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:12 AM2017-09-22T01:12:22+5:302017-09-22T01:12:22+5:30

बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी देखील पावसाने हजेरी लावली.

Due to heavy rains, collapsing of old buildngs | जोरदार पावसामुळे पडझड सुरू

जोरदार पावसामुळे पडझड सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे या आठवड्यात पावसाची चांगलीच उपस्थिती जाणवत आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी देखील पावसाने हजेरी लावली. दुपारी एक वाजेच्या सुमारास अर्ध्या तासात १२.८ मि. मी. पाऊस पडल्याचे चिकलठाणा वेधशाळेने सांगितले.
रात्रभर रिमझिम पाऊस पडल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. परंतु सकाळपासून वातावरण ढगाळ होते. दुपारच्या सुमारास काही वेळ सूर्यदर्शन झाले. त्यामुळे आज पाऊस पडणार नाही, असे वाटत असतानाच दुपारी १२ वाजता काळेकुट्ट आभाळ दाटून आले. साडेबाराला टपोºया थेंबांनी मुसळधार पावसाने सलामी दिली; परंतु पहिल्या टप्प्यात केवळ काही मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर दुपारी १ वाजता धोऽऽ धो पाऊस झाला. पावसाचा तडाखा पाहून बुधवारप्रमाणे शहरात पुन्हा पाणी साचणार असे वाटत होते. मात्र, अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर ओसरला. दुपारनंतर शहरावर ढगांची छाया कायम राहिली.
सलग दुसºया दिवशीही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात २१.१ मि. मी. पावसाची नोंद झाली.
नवरात्र महोत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली. त्यामुळे दसरा खरेदीच्या अपेक्षेने व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला आहे. मात्र, सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने खरेदीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू असल्याने लोकांनी खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळले.त्यामुळे बाजारात गर्दी घटली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. अपेक्षेप्रमाणे दुपारी जोरदार पाऊस आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसातून शहरवासीय अजून सावरलेले नसताना, पावसाने दुसरा तडाखा दिला. अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खडी पसरलेली आहे तर काही ठिकाणी रस्तेच वाहून गेलेले आहेत. खड्ड्यांचा आकार पावसामुळे आणखी वाढलेला असल्यामुळे वाहतुकीची मोठी अडचण होत आहे.
औरंगाबाद तालुक्यात बुधवारी चार मंडळांमध्ये अतिवृष्टी
मागच्या आठ दिवसांपासून शहरावर वरुणराजाची कृपा टिकून आहे. औरंगाबाद तालुक्यात बुधवारी (दि.२०) दहा मंडळांपैकी उस्मानपुरा (७१ मि.मी.), भावसिंगपुरा (७८ मि.मी.), वरुडकाजी (७८ मि.मी.) आणि चिकलठाणा (६५ मि.मी.) या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
याचबरोबर औरंगाबाद शहर (५९ मि.मी.), लाडसावंगी (५० मि.मी.), कांचनवाडी (५३ मि.मी.) आणि करमाड (४१ मि.मी.) या मंडळांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. चित्तेपिंपळगाव (१५ मि.मी.) आणि चौका (१० मि.मी.) या दोन मंडळांचा अपवाद वगळता औरंगाबाद तालुक्यात चांगला पाऊस झाला.
दुपारी चार वाजता सुरू झालेला हा पाऊस सुमारे तीन तास बरसला. सायंकाळी सात वाजता पावसाचा जोर ओसरला; मात्र रात्रभर थोड्याअधिक प्रमाणात रिपरिप सुरूच होती. मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी तुंबले होते. बहुतांश सखल भागांतील घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने सामान्यांचे चांगलेच हाल झाले.
नाले ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. एकूणच शहरवासीयांची दाणादाण उडाली.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महालगावात
औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता बुधवारी वैजापूर तालुक्यातील महालगाव मंडळात (११० मि.मी.) सर्वाधिक पाऊस पडला. जिल्ह्याच्या क्रमवारीत औरंगाबादनंतर वैजापूर तालुक्याचा (५४.९० मि.मी,) दुसरा क्रमांक तर पैठण तालुक्याचा (१५.३० मि.मी.) सर्वात शेवटचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत वैजापूरमध्ये २१ सप्टेंबरपर्यंत १२६ टक्के पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याची बुधवारी सरासरी ३०.३४ मि.मी. एवढी होती.
 

Web Title: Due to heavy rains, collapsing of old buildngs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.