वाळूज महानगर : शुक्रवारी सुटी असल्याने मुलगा नारायण दारू पिऊन आला. नशेत त्याने वडिलांवरच हात उचलला. स्वरक्षणासाठी घरात पडलेली मुसळी पित्याच्या हातात आली. त्याने ती मुलाच्या डोक्यात मारली. तो रक्तबंबाळ होऊन निपचित पडला, तो परत उठलाच नाही. ही घटना शुक्रवारी रात्री ९ ते ९:३० वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी सांगितले की, मयताची आई हौसाबाई तुपे (रा. मूळ गाव नरला ता. फुलंब्री, ह.मु. वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाप -लेकाचे जोरात भांडण जुंपले. यावेळी लहान मुलगा सुरेश घरी होता. पण त्यास कमी ऐकू येते. त्यामुळे त्याला भांडण कशामुळे चालले, हे समजले नाही.
नारायण रोज दारू पिऊन येतो आणि आपल्याशी भांडण करतो, असे म्हणून वडिलांनी घरातील लोखंडी मुसळीने नारायणच्या डोक्यात दोन- चार घाव घातले. त्यामध्ये नारायण बेशुद्ध पडला. नारायणच्या डोक्यातून रक्त निघत होते. त्यास दवाखान्यात नेण्यास नारायणच्या आईने सांगितले. परंतु त्यास वडिलांनी विरोध केला.
अखेर शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लहान मुलाच्या फोनवरून भाऊ गोरखनाथ ओळेकर यास नारायणच्या आईने फोन करून घरी बोलावून घेतले. त्यांनी नातलग भगवान महाजन यांना बोलावले. पण नारायण निपचितच होता. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून नारायणला घाटी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून नारायण मृत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून आरोपी विनायक तुपे यास अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त सचिन सानप, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोहेकॉ बाळासाहेब आंधळे, अंमलदार राजाभाऊ कोल्हे, आदींनी पाहणी केली.