छत्रपती संभाजीनगर : औषधी कंपनीची नोकरी सोडून झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने नांदेडच्या एमआरनेच नशेखोरीसाठी औषधांची तस्करी सुरू केली. अधिकृत एजन्सी परवाना घेत शहरातील एका कुख्यात गुन्हेगारासोबत भागीदारी केली. दोघे मिळून महाविद्यालयीन तरुण-तरुणी, गुन्हेगारांना नशेसाठी औषधांची विक्री करत होते. एजन्सी मालक इरफान अय्युब घोरवडे (वय ३६, रा. नांदेड), कुख्यात गुन्हेगार सय्यद नजिरुद्दीन सय्यद रियाजोद्दीन (रा. हात्तीसिंगपुरा) व इरफानचे काम पाहणाऱ्या अमजद खान अन्वर खान (रा. नांदेड) यांना यात सापळा रचून अटक केल्याचे एनडीपीएसच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले.
शहरातील वाढत्या नशेखोरीवर नुकतीच राजकीय नेत्यांनी सार्वजनिकरीत्या गंभीर चिंता व्यक्त केली. वाढत्या नशेखोरीमुळेच गुन्हेगारी वाढीस लागल्याचे अधोरेखित केले. त्यानंतर शहर पोलिस दल पुन्हा सक्रिय झाले. बुधवारी बागवडे यांना सिडको पोलिस कॉलनीच्या मागील नाल्यावरील पत्र्याच्या शेडमधून नशेच्या गोळ्या व पातळ औषधांची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. दि. २८ रोजी त्यांनी रात्रीतून धाड टाकली. तेथे नजिरुद्दीन, अमजद या दोघांना रंगेहाथ पकडले. भंगारसदृश साहित्यात त्याने औषधांचा साठा लपवून ठेवला होता. नजिरुद्दीन, अमजदच्या चौकशीतून इरफानचे नाव निष्पन्न झाले. गुरुवारी इरफान स्वत: हॉटेलवर थांबला व अमजदला नजिरुद्दीनकडे पैसे आणण्यासाठी पाठविले होते. बागवडे यांनी दोघांना अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवीकांत गच्चे यांनी इरफानच्या हॉटेलमधून मुसक्या आवळल्या. पत्र्याच्या शेडमधून ८८ गोळ्यांसह ८० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
पुन्हा ट्रॅव्हल्समधून तस्करी निष्पन्नऑक्टोबर २०२४ मध्ये हमसफर ट्रॅव्हल्समधून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले होते. इरफानने देखील गुजरातहून न्यू पंजाब ट्रॅव्हल्सद्वारे औषध मागवले होते. शुक्रवारी बागवडे यांनी पथकासह ट्रॅव्हल्स शहरात येताच ताब्यात घेतली. १२७० औषधी बाटल्यांसह बस जप्त केली. नजिरुद्दीन वापरत असलेल्या जागेच्या मालकालाही सहआरोपी करण्यात आले.
एम. फार्मची पदवी, पैशांची हाव कारागृहात घेऊन गेली-मुख्य आरोपी असलेल्या इरफानने एम.फार्मची पदवी घेतली आहे. त्यानंतर मार्केटिंगमध्ये एमबीए देखील केले. जवळपास १५ वर्षे त्याने गुजरात व महाराष्ट्रातील नामांकित औषधी कंपनीत एमआर म्हणून काम केले. कोरोना काळानंतर नोकरी सोडून एक अधिकृत औषधी एजन्सीचा परवाना घेतला. कंपन्यांकडून औषधे घेऊन मेडिकलचालकांऐवजी थेट नशेखोरांना विक्री करू लागला.-कंपनीच्या एका बॉक्समागे त्याला वैधमार्गाने ८०० रुपयांचा नफा मिळत होता. कुख्यात अमली पदार्थांचा तस्कर नजिरुद्दीन मार्फत त्याला प्रतिबॉक्स ५ हजार रुपये मिळायला लागले. या हव्यासापोटी तो इकडे वळाला.- अमजदची सासुरवाडी शहरातील आहे. त्याद्वारेच चार गुन्हे दाखल असलेल्या नजिरुद्दीनच्या तो संपर्कात आला.
दर वाढला, नशेखोरही वाढलेआरोपींचे राज्यभरात नेटवर्क असल्याचा पोलिसांना संशय आहे. न्यायालयाने दोघांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पातळ औषधांची एक बाटली ४००, तर एक गोळी ८० रुपयापर्यंत विक्री होत आहे. यासाठी पैसे कमी पडल्यावर नशेखोर लूटमार करून नशेसाठी पैसे जमा करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.