औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये महापालिकेतील ११५ नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतरही काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी महापालिकेच्या कामात लुडबुड करत असून, यामुळे प्रशासनाला अनेक ठिकाणी कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील ११५ वाॅर्डांमध्ये अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थेट प्रशासनाकडे धाव घेत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वॉर्डस्तरावरील अधिकारी, कर्मचारी समस्यांचे निरसनसुद्धा करीत आहेत. नागरिकांच्या मागणीवरून मनपाच्या अधिकाऱ्यांनी काम केल्यानंतर संबंधित वॉर्डाचे माजी नगरसेवक अधिकाऱ्यांना ‘तुम्हाला काम करायला कोणी सांगितले’, असा जाब विचारत आहेत. काही ठिकाणी मनपा कर्मचारी काम झाल्यानंतर चक्क माजी नगरसेवकांची एका कागदावर सही घेत असल्याचे निदर्शनास आले.
ड्रेनेज चोकअप, नालेसफाई, छोट्या छोट्या नाल्यांमधील घाण, दूषित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा, पथदिवे बंद आदी छोट्या-मोठ्या कारणांसाठी नागरिक मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करून कामे करून घेत आहेत. मागील १३ महिन्यांमध्ये प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये समन्वय निर्माण होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना जणू आपले अस्तित्वच धोक्यात आल्याचे वाटू लागले आहे. वाॅर्डात आपण सांगितलेलीच कामे झाली पाहिजे, असा आविर्भाव काही माजी नगरसेवकांचा आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक वाॅर्डात इच्छुक उमेदवारांची फौजच तयार आहे. त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून काही कामे करून दिली तर माजी नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरीत आहेत. प्रशासनातील काही अधिकारी माजी नगरसेवकांच्या इच्छेनुसारच कामे करीत आहेत हे विशेष.
अर्थसंकल्पाच्या प्रती हव्यात कशाला?मागील वर्षीप्रमाणे यंदाही मनपा प्रशासनाने अत्यंत वस्तुनिष्ठ असा अर्थसंकल्प तयार केला आहे. प्रत्येक वॉर्डातील अत्यंत आवश्यक असलेल्या काही विकासकामांचा यात समावेश करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाच्या प्रती माजी नगरसेवकांना देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र मागील काही दिवसांपासून अर्थसंकल्पाच्या प्रती मिळविण्यासाठी माजी नगरसेवक आग्रही आहेत. काहींनी तर या प्रती मिळविल्यासुद्धा.
पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर माजी शब्दच नाहीमागील पाच वर्षांमध्ये महापालिकेतील नगरसेवकांना वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी आपल्या वाहनांवर महापौर, उपमहापौर, सभापती या नावाने पाट्या लावल्या होत्या. काही जणांनी या पाट्याही बदललेल्या नाहीत.