छत्रपती संभाजीनगर : कोरोनानंतर आता पुन्हा एकदा चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ‘ह्यूमन मेटापन्युमोव्हायरस’ म्हणजे ‘एचएमपीव्ही’ या विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यत: फ्लूप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. मात्र, खबरदारी म्हणून पुरेशी काळजी घेणे आणि उपाययोजना आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कर्नाटकमध्ये या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाली असून, खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्दी, खोकल्यासह श्वसनविकार असलेल्या संशयित रुग्णांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात येणार आहेत. कोरोनासारख्या महामारीला आरोग्य यंत्रणेने समर्थपणे तोंड दिलेले आहे. त्यामुळे कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.
ही घ्या काळजी- खोकला, शिंका येत असतील तर तोंड आणि नाक रुमालात झाका.- साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुवा.- ताप, खोकला, शिंका येत असल्यास गर्दीत जाणे टाळा.- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.- हस्तांदोलन टाळा.- एकाच रुमालाचा, टिश्यू पेपरचा वारंवार वापर टाळा.- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श टाळा.- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळा.
घाबरण्याचे कारण नाहीचीनमधील नव्या विषाणूसंदर्भात घाबरण्याचे कारण नाही. खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा.- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक
आवश्यक ती खबरदारीसर्व आरोग्य केंद्रांना सूचना दिलेली आहे. श्वसनविकार असणाऱ्या संशयित वाटणाऱ्या रुग्णांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात येतील. आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा