छत्रपती संभाजीनगर : रविवारी झाल्टा गावातून निघालेल्या मिरवणुकीदरम्यान ट्रिपलसीट तरुणांनी दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसरीकडून जाण्यास सांगितल्यावरून वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. रविवारच्या या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी सकाळी ११:०० वाजता उमटून एका कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.
झाल्टा गावात कानिफनाथ महाराजांचे मंदिर असून, दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त कान्होबाच्या काठीची मिरवणूक काढली जाते. रविवारी रात्री ८:०० वाजता गावातून मिरवणूक निघाली. यादरम्यान गावातीलच अमन शेख अन्य दोघांसह मिरवणुकीच्या दिशेने जात होता. रमेश शिंदे यांच्या घरासमोर मिरवणुकीची पूजा सुरू असल्याने गर्दी होती. त्यामुळे अमनला दुसरीकडून जाण्यास सांगितले. अमनने त्यांना शिवीगाळ केल्याने रमेश यांचा पुतण्या विशालने त्याच्या कानशिलात लगावली. यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. रमेश यांनी तत्काळ भांडण मिटवले.
चटई अंथरली, चहाही सांगितला पण...सोमवारी सकाळी ११:०० वाजता अब्दुल अकबर शेख, हनीफ यासिन शेख, हुसेन बाबूलाल शेखसह जवळपास १५ ते २० जण गोरख शिंदे यांच्या घरी गेले. शिंदे यांनी त्यांना मुलांचे वाद मिटवून घेऊ, असे सांगत बसण्यास चटई दिली. चहादेखील सांगितला. मात्र, तरीही काहींनी अचानक विशालवर हल्ला चढवला. गोरख यांच्यासह कुटुंबातील महिलांना बॅट, दांड्याने मारहाण केली. चिकलठाणा पोलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला. हल्लेखोरांनी नंतर पोबारा केला.
ठाण्यासमोर मोठा जमावसोमवारी दुपारी १:०० वाजता चिकलठाणा ठाण्यासमोर ७० ते ८० जणांचा जमाव जमला. ग्रामीण उपअधीक्षक पूजा नांगरे, सहायक आयुक्त सुदर्शन पाटील, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर, चिकलठाण्याचे रविकिरण दरवडे यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. ठाण्याकडे येणाऱ्या जमावाला शहर पोलिसांनी आधीच हुसकावून लावले. गावात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त होता.
चार ताब्यात, एकाची गुन्हेगारी पार्श्वभूमीतणावप्रकरणी अब्दुल अकबर शेख, हनीफ यासीन शेख, हुसेन बाबूलाल शेख, सद्दाम शेख, अदिल पटेल, जाकेर शेख, जावेद शेख, शाहरुख शेख, साहिल शेख, फरान खान, गुड्डू शेख, मुन्ताज पठाण, अलीम शेख, अश्पाक शेख, इमरान शेख, अमन शेख व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अब्दुल अकबर शेखवर बेगमपुरा व चिकलठाणा ठाण्यात दाेन गुन्हे दाखल असून, चार संशयित ताब्यात घेतल्याचे निरीक्षक दरवडे यांनी सांगितले.