- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : ‘तुमचे वडील गंभीर आहेत. कधीही ते हे जग सोडून जाऊ शकतात. त्यांना लवकर भेटायला या.’ कृपाळू वृद्धाश्रमातून दिनेश यांच्या मुलाला फोन गेला. मात्र, ‘माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही,’ असे म्हणत त्याने फोन कट केला. त्यानंतर गुरुवारी दुपारी वृद्धाश्रमातच दिनेश यांचा मृत्यू झाला. अखेरच्या क्षणापर्यंत मुले आली का? हा प्रश्न ते विचारत राहिले. पण मुले, पत्नी कोणीही त्यांना पाहायला आले नाही. या घटनेमुळे वृद्धाश्रमातील कर्मचारी, संचालक धाय मोकलून रडले.
दीड वर्षापूर्वी कृपाळू वृद्धाश्रमाचे संचालक संतोष (अण्णा) सुरडकर यांना टीव्ही सेंटर परिसरातील सुरक्षारक्षकाचा फोन आला. त्यांच्यासोबत काम करणारे ६५ वर्षीय दिनेश यांची मानसिक स्थिती ढासळली होती. त्यानंतर दामिनी पथकाच्या साहाय्याने त्यांना वृद्धाश्रमात आणण्यात आले. दामिनीने त्यांच्या शहरातील मुलाला फोन करून तुमच्या वडिलांना न्यायला या, असा निरोप दिला. त्यावर त्याने येण्यास नकार दिला. त्यांचा दुसरा मुलगा दुबईला राहतो.
दिनेश वृद्धाश्रमातच राहत होते. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि ते सर्वांशी मिळून-मिसळून राहत होते, असे सुरडकर यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत ढासळली. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, तेव्हाही मुलगा आला नाही. दुबईच्या मुलाने उपचारांसाठी काही पैसे पाठवले. यातून ते बरे झाले. मात्र, आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी त्यांनी ‘आता काही मी जगत नाही, माझ्या मुलांना बोलवा,’ असा निरोप दिला. दोन्ही मुलांनी पुन्हा नकार दिला.
दिनेश यांचा श्वास गुरुवारी मंदगतीने सुरू झाला होता. सुरडकर यांनी त्यांना शेवटचे पंचामृत पाजले. ‘तुमची शेवटची इच्छा काय आजोबा?’ असा प्रश्न विचारला, त्यावर ते ‘माझी मुले येतील का?’ असे म्हणाले. पुढे ‘तुम्ही माझ्यासाठी खूप केले...’ असे म्हणत त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच. संचालकांनी दोन्ही मुलांना फोन केले. दुबईच्या मुलाने वडील गेल्याची बातमी ऐकताच भावनाशून्यपणे ‘मी पैसे पाठवतो. तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या,’ असे सांगितले; तर येथील मुलाने दुर्लक्ष केले.
पालघरहून पुतण्या आला, पण मुलगा नाही आलादिनेश शेवटच्या क्षणापर्यंत मुलांची वाट पाहत होते. त्यांना फक्त एकदा मुलांना भेटायचे होते. मी त्यांच्या शहरातील मुलाला खूप विनवण्या केल्या. फोन केले; पण तो आला नाही. त्यांचे पालघरला राहणारे पुतणे अंत्यसंस्कारांसाठी आले; पण शहरात असलेला मुलगा आला नाही, याचे खूप वाईट वाटले.- संतोष (अण्णा) सुरडकर, संचालक