औरंगाबाद : शहरात चोऱ्या, घरफोड्यांसोबत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी सिडको एन-५ आणि सिंधी कॉलनी येथे दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळी चोरट्यांनी तोडून नेल्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी सायंकाळी समर्थनगर येथील नाल्याजवळ एका महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी तोडून नेली. समर्थनगर येथील प्रभावती शिरीष सोनवणे या सोमवारी सायंकाळी स्वातंत्र्यसैनिक कॉलनी येथून एका मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. समर्थनगर येथील नाल्याजवळून त्या जात असताना मोटारसायकलस्वार दोन जण त्यांच्या समोरून आले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या एका जणाने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि ते ‘धूम स्टाईल’ ने निघून गेले. यावेळी सोनवणे यांनी आरडाओरड केली. परंतु लोकांना काही कळण्यापूर्वीच चोरटे पसार झाले. या घटनेनंतर सोनवणे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. माहिती मिळताच ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नाकाबंदीत व्यग्र होते.दोन दिवसांपूर्वीच्या घटनांत मंगळसूत्र चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पण अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
समर्थनगरातून पळविली ‘धूम’ स्टाईलने सोनसाखळी
By admin | Updated: July 28, 2015 01:22 IST