देना, विजया बँकेचे बडोदा बँकेत विलीनीकरणानंतर विभागात ८९ शाखा अतिरिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:00 PM2019-04-03T15:00:42+5:302019-04-03T15:01:32+5:30
मराठवाड्याचा स्वतंत्र विभाग करण्याचाही प्रस्ताव
औरंगाबाद : विभागात देना बँक व विजया बँकेच्या मिळून १०० शाखा आहेत तर बँक आॅफ बडोद्याच्या ८९ शाखा आहेत. विभागात १०० शाखा असाव्यात अशी नियमावली आहे. यामुळे ८९ शाखा अतिरिक्त ठरणार आहेत. यातील काही टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. जेथे शाखा नाही तेथे नवीन शाखा उघडण्यात येतील. तसेच मराठवाड्याचा स्वतंत्र विभाग करण्यात यावा, असा प्रस्तावही तयार केला असल्याची माहिती बडोदा बँकेचे उपमहाव्यवस्थापक व विभागप्रमुख सुरेंद्र शर्मा यांनी दिली.
देना व विजया बँकेचे १ एप्रिलपासून विलीनीकरण होऊन बँक आॅफ बडोदा ही राष्ट्रीयीकृत क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी बँक बनली आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा यांनी सांगितले की, मराठवाडा, अहमदनगर, नाशिक, नंदूरबार, धुळे या सर्वांचा मिळून एक विभाग होतो. बडोदा बँकेची १० हजार कोटी तर देना व विजया बँक मिळून ७ हजार कोटी, अशी वार्षिक १७ हजार कोटींची उलाढाल होत आहे. विभागात ३ बँकेचे मिळून आता २ हजार कर्मचारी झाले आहेत. तीन महिने आॅडिट सुरू राहणार आहे. त्यानंतर उलाढालीची एकूण आकडेवारी समोर येईल.
वर्षभरानंतर अतिरिक्त शाखा बंद होतील
ज्या ठिकाणी देना, विजया व बडोदा बँकेच्या शाखा जवळ आहेत, त्या ठिकाणी ज्या शाखेची उलाढाल सर्वात कमी आहे, ती शाखा बंद करण्यात येईल. तसेच मंठा, माजलगाव, मालेगाव, केज आदी ठिकाणी शाखा नाहीत, त्याठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यात येतील. आयटीचे एकीकरण १२-१८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. विलीनीकरणाची प्रक्रिया सहजतेने करण्यात येईल. यामुळे देना व विजया बँकेच्या ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक के. सुब्रमणियन यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात देना, विजया बँकेची वार्षिक ७०० कोटींची उलाढाल
औरंगाबादेत देना बँकेच्या अदालत रोड, शेंद्रा, पिंपळवाडी, लोहगाव व बंगला तांडा, अशा ५ शाखा आहेत. २ एटीएम आहेत व वार्षिक ५०० कोटींची उलाढाल व ३० कर्मचारी आहेत. तर विजया बँकेच्या विवेकानंद महाविद्यालय रस्ता, गारखेडा व वाळूज, अशा तीन शाखा आहेत. ३ एटीएम आहेत. वार्षिक उलाढाल २०० कोटींची व २० कर्मचारी कार्यान्वित आहेत.