औरंगाबाद : ओळखीच्या तरुणीसोबत काढलेली छायाचित्रे आणि तिचे बनावट अर्धनग्न छायाचित्रे इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर टाकून तिची बदनामी आणि विनयभंग करणाऱ्या तरुणाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.
अक्षय वानखेडे (रा. महालक्ष्मी चौक, सिडको एन-२), असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी यांची २०१८ पासून ओळख आहे. त्यांच्यात मैत्री होती तेव्हा त्यांनी एकत्र छायाचित्रे काढली होती. पीडितेचे लग्न झाल्यावर आरोपीने तिच्यासोबत काढलेली छायाचित्रे आणि अश्लील छायाचित्रे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून अपलोड केली. हे छायाचित्रे तक्रारदार यांच्या पती आणि सासरच्या मंडळींनी पाहिले. यामुळे त्यांनी तिला तिच्या माहेरी आणून सोडले.
त्यानंतर आरोपीने काही दिवसांपूर्वी तिला घराबाहेर गल्लीत बोलावून तिचा विनयभंग केला. तिला, तिचे आई-वडील आणि भावाला त्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या त्रासाला कंटाळून पीडितेने काल मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी आरोपी अक्षयला अटक केली.