छत्रपती संभाजीनगर : साडेपाच वर्षांच्या बाळावर चुकीचे व निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात २६ एप्रिल ते ६ मे २०२४ दरम्यान घडली. या प्रकरणात घाटीतील उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानंतर रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख इलियास, डॉ. अजय काळे, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. तुषार चव्हाण आणि डॉ. नितीन अधाने यांचा समावेश आहे. औरंगाबाद खंडपीठात वकिली करणारे ॲड. अविनाश आघाव (रा. स्वप्ननगरी, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा दैविक यास २० एप्रिल रोजी खाजेचा त्रास होत असल्यामुळे दाखविले. तेव्हा डॉ. अर्जुन पवार यांनी बाळाला ‘फायमोसीस विथ पिनाईल टॉर्नन’ हा आजार असून, त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागेल असे सुचविले. त्यानुसार २५ एप्रिल रोजी बाळाला ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात दाखल केले. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता दैविकला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली. सव्वासात वाजता डॉ. अर्जुन पवार, भूलतज्ज्ञ डॉ. शेख मोहंमद इलियास आले. त्यांनी २० ते २५ मिनिटांत ऑपरेशन होईल, असे सांगितले. मात्र, ४५ मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. एक तासाने डॉ. पवार ओ.टी.तून बाहेर आले. त्यांनी ’ऑपरेशन चांगले झाले आहे. डॉ. इलियास यांनी बाळाला स्पाईनलमध्ये भूल दिली होती. पण, बाळाने मध्येच हात हलविल्यामुळे त्याला परत झोपेचे इंजेक्शन द्यावे लागले. त्यामुळे बाळ सध्या बेशुद्ध आहे. थोड्या वेळाने शुद्धीवर येईल’, असे सांगितले आणि निघून गेले.
दहा दिवसांनंतर बाळाचा मृत्यू२६ एप्रिल रोजी हसत खेळत असलेल्या वैदिकवर किरकोळ ऑपरेशन केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ऑपरेशननंतर तो शुद्धीवर आलाच नाही. त्याच्यावर ६ मे पर्यंत आयसीयूत उपचार सुरू होते. ६ मे रोजी दुपारी ३:३० वाजता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दहा दिवस उडवाउडवीची उत्तरेऑपरेशन केल्यानंतर बाहेर आणलेला दैविक थोड्या वेळाने शुद्धीवर येईल, असे म्हणत डॉक्टरांनी १० दिवस पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तो शेवटपर्यंत शुद्धीवर आलाच नाही. दवाखान्यातील सर्व डॉक्टर आणि नर्स यांनी ‘काही वेळापूर्वी त्याने डोळे उघडले होते, हातपाय हलवले होते, आता तो झोपलेला आहे’, अशी चुकीची माहिती दिल्याचाही आरोप फिर्यादीत केला आहे.
इंजेक्शनचा उपचारात उल्लेख नाहीदैविकला ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी ‘स्पाईनल’मध्ये भूल दिली होती. मात्र, ऑपरेशन सुरू असताना बाळाने हात हलवल्यानंतर डॉ. शेख इलियास यांनी बाळाला झोपेचे इंजेक्शन दिले. सीसीटीव्हीत तो तीन इंजेक्शन देताना दिसत आहे. ते तीन इंजेक्शन नेमके कशाचे? याचा उल्लेख उपचाराच्या कागदपत्रांमध्ये नाही, असे उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले आहे.