राजू वैष्णव , सिल्लोड लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपला आहे. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागत आहेत. निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे उमेदवारांच्या काळजाचे ठोके वाढत आहेत. पुढारी व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या निकालाची चर्चा रंगू लागली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे व महायुतीचे उमेदवार खा.रावसाहेब दानवे यांच्यामध्ये काट्याची लढत झाली. निवडणुकीचा निकाल दि. १६ मे रोजी लागणार आहे. तत्पूर्वीच विविध पक्षांचे कार्यकर्ते आकडेमोड करीत आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असा दावा करीत आहेत. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली असून आपापसात पैजा लागत आहेत. पुढारी, कार्यकर्ते व मतदारांची निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिल्लोड -सोयगाव तालुक्यात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा आ. अब्दुल सत्तार व प्रभाकर पालोदकर यांच्या खांद्यावर होती. आ.सत्तार यांची सिल्लोड-सोयगाव मतदारसंघावर चांगली पकड असून त्यांनी कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी केलेली आहे. आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रभाकर पालोदकर यांनीही आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तालुका पिंजून काढला. गेल्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला सिल्लोड-सोयगाव तालुक्यामध्ये दीड हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्या निवडणुकीत प्रभाकर पालोदकर यांनी आपली रसद खा.रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी उभी केली होती. शिवाय सिल्लोड-सोयगाव पंचायत समित्या युतीच्या ताब्यात होत्या. या निवडणुकीत मात्र राजकीय चित्र उलट आहे. सिल्लोड-सोयगाव पंचायत समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. शिवाय पालोदकर यांनीही आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तालुकाभर सभा घेतल्या. खा. दानवे यांच्या प्रचारासाठी भाजपा-शिवसेना महायुतीच्या पदाधिकार्यांनी सिल्लोड -सोयगाव तालुका पिंजून काढला. ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले गेलेले बाजार समितीचे सभापती श्रीरंग पा. साळवे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. साळवे यांनीही आपल्या समर्थकांसह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तालुक्यात सभा घेऊन प्रचारात रंगत आणत निवडणूक प्रतिष्ठेची केली. आघाडी-महायुतीच्या पदाधिकार्यांमधून आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल व आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला सिल्लोड -सोयगाव तालुक्यामधून मताधिक्य मिळेल, असा दावा के ला जात आहे. भाजपाने दाखवले एकीचे बळ माजी आमदार सांडू पा.लोखंडे, साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोर्डे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष इद्रीस मुलतानी, तालुकाध्यक्ष सुनील मिरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर मोटे, हरिकिसन सुलताने, अशोक गरुड, राजेंद्र जैस्वाल यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्यांनी खा.दानवे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन एकीचे बळ दाखवले. विधानसभेची रंगीत तालीम पाच- सहा महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीची ही निवडणूक पुढार्यांसाठी रंगीत तालीम होती. या निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामधून ज्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळेल, त्या पक्षाची मतदारसंघातील ताकद दिसून येणार आहे. या निवडणुकीतील मताधिक्य आगामी विधानसभा निवडणुकीचे भाकीत ठरणार आहे.
निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला
By admin | Updated: May 15, 2014 00:28 IST