ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ६ : पैसे घेतल्यानंतरही मुदतीत फ्लॅट न देता एका ग्राहकाला तब्बल २५ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बिल्डर पिता-पुत्रासह तीन जणांविरूद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बिल्डर सुरेश रुणवाल, सुयोग रुणवाल, त्यांचा मॅनेजर मुकुंद व्यंकटेश डफळ(दशमेशनगर, उस्मानपुरा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक सतीश टाक म्हणाले की, तक्रारदार संतोष प्रदीप पाटील हे वैद्यकीय व्यवसायिक आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आरोपी बिल्डर रुणवाल यांच्या नक्षत्रवाडी येथील साईटमधील फ्लॅट खरेदीसाठी करार केला होता. या करारनाम्यानुसार तक्रारदार यांनी बिल्डर्सला एकणू २५ लाख ७१ हजार ८०० रुपये दिले. ही रक्कम २३ नोव्हेंबर २०१२ ते २०१४ या कालावधीत आरोपीच्या दशमेशनगर येथील कार्यालयात त्यांनी दिली. २०१४ मध्ये फ्लॅटचा ताबा देण्याची बोली त्यांच्यात झाली होती. रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी तक्रारदार यांना फ्लॅट दिला नाही.
आरोपींनी आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी याविषयी अधिक चौकशी केली असता या बिल्डरांनी त्यांच्या ओळखीचे वैभव भगत (रा. मुकुंदवाडी), एकनाथ पठारे आणि शलाका कहांडळ यांचीही अंदाजे ७५ लाखाची फसवणुक केल्याचे त्यांना समजले. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. असे असले तरी अन्य लोकांची जर फसवणुक झाली असेल तर त्यांनी याविषयी आमच्याकडे तक्रार करावी, असे निरीक्षक टाक म्हणाले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी बिल्डर आणि त्यांच्या मॅनेजरविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.