कळंब : महाग्रारोहयोच्या कामात शासनाची फसवणूक करून १ कोटी, ९ लाख ५३ हजार ९२९ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी कळंबचे तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदारांसह सात जणाविरूद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हा गुन्हा दाखल झाल्याने रोहयो कामात गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तीन वर्षात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहे़ यातील अनेक कामात अनियमितता, गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या़ या धर्तीवर येरमाळा, हावरगाव व शेळका धानोरा येथील रस्त्याच्या आठ कामाच्या मजुरांच्या व वाहतुकीच्या प्रलंबीत देयकांचा विषय मध्यंतरी ऐरणीवर आला होता़ कळंब येथे मुख्यालय असलेल्या लघू पाटबंधारे उपविभाग भूम या यंत्रणेमार्फत कामे केली आहेत, असे दर्शवून या संबंधाीचे देयके सादर करण्यात आली होती़ जवळपास एक कोटी ९ लाख रूपयांची ही देयके होती़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कळंबच्या तहसीलदारांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार तहसीलदारांनी २०१२-१३ मध्ये झालेल्या कामाच्या मजुरी व वाहतुकीच्या प्रलंबीत देयकाबाबत चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० आॅक्टोबर २०१४ रोजी पाठविला होता़ यावर कळंबच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही २९ जानेवारी २०१५ रोजी आपला अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता़ यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित आठ कामे ही यंत्रणेमार्फत झाली नसल्याचे स्पष्ट होत असल्याने संकेतस्थळावरून रद्द करण्याचे तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते़ यानुसार मूळ अभिलेखे गहाळ करणे, नरेगा संकेतस्थळावर देयकांची नोंद करणे, वाशी तालुक्यासाठी देण्यात आलेली हजेरी पुस्तके कळंब तालुक्यासाठी वापरणे, हजेरी पुस्तकावर ग्रामरोजगार सेवकांची स्वाक्षरी नसणे, कार्यालयात अभिलेखे उपलब्ध नसताना संकेतस्थळावर परस्पर देयके नोंदविणे आदी ठपके निश्चित करण्यात आले आहेत़ याप्रकरणी अव्वल कारकून रवींद्र भांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन तहसीलदार डी़एच़राठोड यांच्यासह नायब तहसीलदार डी़एम़शिंदे, कंत्राटी लेखापाल गणेश फत्तापुरे, अव्वल कारकून एऩडी़पवार, लिपीक समीर पठाण, लघू पाटबंधारे भूम उपविभागाचे तत्कालीन उपअभियंता व शाखा अभियंता यांच्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोनि चंद्रकांत सावळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
तहसीलदारासह सात जणांविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: March 18, 2015 00:18 IST