सिल्लोड : वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या रस्त्यावर कार उभी करणाऱ्या चालकाला पोलिसांनी सिल्लोड शहर ठाण्यात आणले. यावेळी कारमधील पती-पत्नी, त्यांची मुलगी व एका विधिसंघर्षगस्त मुलाने ठाण्यातच फौजदाराला बेदम मारहाण केली. गोंधळ घालत संगणक व कागदपत्रे फेकून दिली. ही शुक्रवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. बाबू सुखदेव मुंडे असे मारहाणीत जखमी झालेल्या फौजदारांचे नाव असून, त्यांना उपचारांसाठी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
गोकुळ कडूबा निकाळजे (वय ४५) त्याची पत्नी उषा गोकुळ निकाळजे (४२), मुलगी कोमल गोकुळ निकाळजे (२२, सर्व रा. धावडा, ता. सिल्लोड, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) आणि एक विधिसंघर्षग्रस्त मुलगा अशी आरोपींची नावे असून, त्यांना अटक केली आहे. दरम्यान, निकाळजे हा नीलम चौकात कार (एमएच ०६ एडब्ल्यू ३९०५) रस्त्यावर उभी करून पत्नी, मुलांसह खरेदीसाठी गेला होता. यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. ती सुरळीत करण्यासाठी फौजदार मुंढे तेथे गेले होते. यावेळी वाद झाल्याने कारसह सर्व आरोपींना सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आणले होते. ठाण्यात आल्यावर चारही आरोपींनी वर्दीवरील फौजदार मुंढे यांची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली. ठाण्यातील संगणक तोडण्याचा प्रयत्न करून कागदपत्रे फेकली. आरोपींनी मुंढे यांना, तुझा वर्दीचा माज जिरवतो, असे म्हणत जिवे मारण्याची व ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करीत वाद सोडविला. मुंढे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, निरीक्षक शेषराव उदार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गुन्हा नोंदवू नये म्हणून दबावफौजदाराला मारहाण होऊनही आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून नये, यासाठी काही मातब्बर नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता. मात्र, ठाण्यात फौजदाराला झालेली मारहाण दुर्लक्ष करण्यासारखी नसल्याने दबाव झुगारून रात्री उशिरा चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
दोन दिवसांत दुसरी घटनासिल्लोड शहर ठाण्यातच बुधवारी सायंकाळी एका महिला पोलिस शिपायाला तक्रार नोंदविण्यास उशीर झाला म्हणून तिघांनी मारहाण केली होती. यानंतर दोन दिवसांतच शुक्रवारी याच ठाण्यात चक्क फौजदाराला मारहाण करण्यात आली.