चार मोबाइल टॉवर सील
औरंगाबाद : महापालिकेच्या विशेष मालमत्ता कर वसुली पथकाने शुक्रवारी मिसारवाडी, जालना रोडवरील अमरप्रीत हॉटेल परिसर, पदपुरा भागातील कर थकविलेल्या मोबाइल कंपन्यांचे चार टॉवर सील केले. सोबतच विविध भागात कारवाई करताना पाणीपट्टी थकवणार्या चार मालमत्ता धारकांच्या नळजोडण्या देखील खंडित केल्या.
रिकव्हरी रेट ७ टक्क्यांनी घटला
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अलीकडे कोरोनातून बरे होणार्या रुग्णांच्या प्रमाणातही (रिकव्हरी रेट) घट झाली आहे. जानेवारीदरम्यान शहरात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ ते ९६ टक्के एवढा होता. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत असून मृत्युदरही वाढला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट तब्बल सात टक्क्यांनी घटून ८८.४३१ टक्क्यांवर आला आहे.
रेल्वे स्टेशन, विमानतळावर दोन पॉझिटिव्ह
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन, विमानतळावर शुक्रवारी १४६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. गुरुवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यातील दोन जण आज पॉझिटिव्ह आढळून आले.
चिकलठाणा येथे रस्त्यावर सांडपाणी
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरात जालना रोडवर जिल्हा सामान्य रुग्णालय ते राठी कॉम्प्लेसदरम्यान सांडपाण्याच्या नालीचे काम नॅशनल हायवे अॅथॉरिटीने सुरू केले आहे. या कामात त्यांनी जागोजागी सांडपाण्याच्या नालीची तोडफोड केली आहे. त्यामुळे रस्त्यावरच दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, तसेच नाली दुरुस्तीचे काम गतीने करावे, असे आदेश महापालिका प्रशासक यांनी शुक्रवारी दिले.