सोयगाव : लॉकडाऊनमुळे सोयगावातील कुटुंबियांना औरंगाबादला काकूच्या अंत्यसंस्कारास जाण्याची परवानगी मिळाली नाही. यामुळे अखेर नातेवाईकांनी सोयगाव येथूनच व्हिडीओ कॉलकरून सोमवारी पहाटे औरंगाबाद येथे झालेल्या अंत्यसंस्कारात ऑनलाईन सहभाग घेतला.
सोयगाव येथील बीएसएनएल मधील कर्मचारी शेख सुलेमान यांची काकू शाहेदा बेगम सुलताना(वय ६४)यांचे रविवारी मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी पहाटे सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु शेख परिवाराला औरंगाबादला जाण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली नाही.
यावेळी शेख सुलेमान यांना औरंगाबाद येथील भाऊ मोहम्मद इम्रान याने अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना मोबाईलवरून व्हिडीओ काॅल केला. अशारितीने सोयगावातून शेख सुलेमान त्यांची आई व पत्नी यांनी अंत्यसंस्कारात आॅनलाईन सहभाग घेतला. लॉकडाऊनचे पालन करत अंत्ययात्रेत आॅनलाईन सहभागी होत शेख कुटुंबांनी सर्व विधी पार पाडले.