कोरोना सुरू होण्यापूर्वीसुद्धा फार मोठ्या संख्येने देहदान होत नव्हते. जे होत होते ते आता अजिबातच होत नाही, अशी माहिती देहदान चळवळीत काम करणाऱ्या औरंगाबाद युथ सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेशसिंह सूर्यवंशी यांनी दिली.
कोरोनाच्या नावाखाली नैसर्गिक मृत्यू झालेल्यांचे देहदानसुद्धा स्वीकारले जात नाही. नेत्रदानसुद्धा ठप्पच आहे. याबद्दलची खंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यात कुठेही स्कीन बँक नाही. औरंगाबादसारख्या मुख्यालयाच्या ठिकाणी स्कीन बँकेची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक महिला भगिनी जळून भाजून मृत्यू पावतात. हे प्रमाण मोठे आहे. परंतु स्कीन बँक नसल्यामुळे स्कीन जतन करता येत नाही, याकडेही सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले आहे.
नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींची देहदान प्रक्रिया सुलभ व त्वरित सुरू व्हावी, अशी मागणी राजेश सूर्यवंशी यांच्यासह प्रा. चंपालाल कहाटे, प्रा. रवींद्र पाटील व प्रा. डॉ. मंगेश मोरे आदींनी केली आहे.
पूर्वी महिन्याला १० व्यक्तींचे देहदान होत होते. मार्च २०२०नंतर देहदानाचा अर्ज करून येणाऱ्या नॉन कोविड व्यक्तींचेही देहदान होऊ शकले नाही. संबंधित यंत्रणा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे देहदान, अवयव दान व नेत्रदान स्वीकारण्यास तयार नाही.
काल्डा कॉर्नर येथील चौबे यांचे देहदान करून घेताना बरेच प्रयत्न करावे लागले होते. या घटनेला आता पाच महिने झाले आहेत. अनेक जण नेत्रदान व देहदानास तयार आहेत. परंतु संबंधित यंत्रणा देहदान व नेत्रदान स्वीकारत नसल्यामुळे ही चळवळ फार मागे गेली आहे.