मागील वर्षी शहराच्या पाच एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणीसाठी शिबिरे सुरू केली होती. चिकलठाणा येथील केंब्रिज शाळा, सावंगी टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या ठिकाणी करोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बाहेर गावाहून येणाऱ्याची या पॉइंटवर चाचणी केली जात होती. चाचणी निगेटिव्ह आली तरच शहरात प्रवेश दिला जात होता. आता पुन्हा शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
शहराच्या एन्ट्री पॉइंटवर पूर्वीप्रमाणेच करोना चाचणी करण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. येत्या दोन दिवसात नियोजन पूर्ण करून प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात केली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या बाधितांना शहराच्या बाहेरच रोखता येईल. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा खासगी दवाखान्यात पाठवता येईल. त्यामुळे काही प्रमाणात संसर्गाला ब्रेक लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यापाऱ्यांसाठी सहा टीम
व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांसह कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी पालिका स्वतंत्र सहा टीम उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये तपासणी नाही
शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आजपर्यंत तपासणी करण्यात आलेली नाही. संसर्गाचा सर्वाधिक धोका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे.
-