दूषित पाणीपुरवठा आरोग्याला धोका

By Admin | Updated: June 27, 2015 00:09 IST2015-06-27T00:09:31+5:302015-06-27T00:09:31+5:30

दरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो.

Contaminated water supply | दूषित पाणीपुरवठा आरोग्याला धोका

दूषित पाणीपुरवठा आरोग्याला धोका

तुरटीचे प्रमाण वाढविले : प्राधिकरणकडून उपाययोजना सुरु
वैभव बाबरेकर अमरावती
दरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो. पाणी ढवळले गेल्याने ही स्थिती उत्पन्न होते. मात्र, यामुळे आजार बळावतात. सद्यस्थितीत शहरातील अनेक भागांत प्राधिकरणद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्याला घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पावसाळ्यात नदी, नाले, तलाव व अन्य जलस्त्रोतातील पाणी सिंभोरा धरणात जमा होते. यानंतर धरणाची पातळी हळूहळू वाढू लागते. सिंभोरा धरणाची जलपातळी मर्यादा ३४२.५० मीटर असून सद्यस्थितीत धरणात ३३८.९८ मीटर पाणी जमा झाले आहे. नवीन पाणी येत असल्याने पाणी ढवळले जात आहे. त्यामुळे खालचा गाळ वर येऊन गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सिंभोरा येथील हे पाणी अमरावतीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे आणले जाते. त्यानंतर जलशुध्दीकरण केंद्रावर ते शुध्द करून त्याचा अमरावतीकरांना पुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच प्रक्रिया अविरत सुरु आहे. ही स्थिती दरवर्षीच उद्भवते.

दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा
जलशुध्दीकरण के्रंदावरून दररोज अमरावतीकरांना ११० दशलक्षलिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मजीप्राकडे जवळपास एक लाख ग्राहक असून सुमारे पाच लाख नागरिक पाणी पीत असल्याचे निदर्शनास येते. गढूळ पाण्यामुळे पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दरवर्षीच पहायला मिळते.

पाण्याची गढुळता वाढताच तुरटीचे डोज वाढविण्यात येते. दरवर्षीच पावसाळ्यात धरणातील पाणी ढवळले जाते. अशावेळी अल्प प्रमाणात गढूळ पाणी दिसून येते. पाणी तपासणी करून ते पिण्यास योग्य असल्याची शहानिशा करूनच नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येते.
- डी.एन. आमले,
उपअभियंता(यांत्रिकी)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

गढूळ पाण्यात जीवजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. दूषित पाण्यामुळे डायरिया व उलटी आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे गढूळ पाणी उकळून थंड करून प्यावे. या दिवसांत संसर्ग होण्याची भीती असते.
- अविनाश लव्हाळे,
आरोग्य उपसंचालक.

Web Title: Contaminated water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.