छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकासह तरुणाचे अपहरण करणाऱ्या राजकीय पदाधिकारी असलेल्या संदीप भाऊसाहेब शिरसाठ याचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र परवाना घेऊन संदीप पिस्तूल बाळगत होता. मंगळवारी पोलिसांनी ते जप्त केले. त्याचा शस्त्र परवानादेखील रद्द केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शासकीय कामांच्या टेंडर प्रक्रियेत मदत करण्याचे काम करणाऱ्या अभिजीत ऊर्फ बंटी बर्डे (२८) व बांधकाम व्यावसायिक शरद भावसिंग राठोड यांचे संदीपने पोलिस विभागात असलेला भाऊ मिथुन शिरसाठच्या मदतीने अपहरण केले. राठोड यांना बेदम मारहाण करून सोडून दिले. मात्र, अभिजीत यांना जवळपास १५ तास ओलिस ठेवत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. राठोड यांच्यामुळे पोलिसांपर्यंत खबर पोहोचली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्याने रविवारी रात्रीपर्यंत संदीपला अटक करून अभिजीत यांची सुटका करण्यात आली.
तीन साथीदार अटकेत, भाऊ पसारचसंदीपच्या टोळीचे मुख्य साथीदार हर्ष अंतेश्वर कांबळे (२८), स्वप्निल किसन गायकवाड (२७) व नीकलेश लालाजी कांबळे (३९, सर्व रा. सुधाकरनगर) यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांनाही ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे सहायक निरीक्षक शैलेश देशमुख यांनी सांगितले. शहर पोलिस दलातील अंमलदार व संदीपचा पोलिस अंमलदार भाऊ मिथुन अद्यापही पसारच आहे.
परवाना नूतनीकरणासाठी अर्जसंदीप शिरसाठ याने २०१२-१३ मध्ये वैयक्तिक सुरक्षेचे कारण देत शस्त्र परवाना घेतला होता. नुकताच त्याने परवाना नूतनीकरणासाठी अर्ज दिला होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्यावर अपहरण, हत्येचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल झाला.
हर्षविरुद्ध यापूर्वीही गुन्हागुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्षविरुद्ध यापूर्वी अनेक तक्रारी आहेत. १४ मार्च रोजी त्याने सुधाकरनगरमध्ये दोन टवाळखोरांसह एका २४ वर्षीय तरुणावर फायटरने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सातारा पोलिस ठाण्यात त्याच्यावर १५ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला. २०१८ मध्येही सातारा ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. हर्ष, स्वप्निलचे वडील पोलिस दलात अंमलदार आहेत.