बदलती परिस्थिती : आरोग्यदायी शुद्ध हवेशीर वातावरणाला दिले जातेय प्राधान्य
औरंगाबाद : पूर्वी लोक गजबजलेल्या वसाहतीत घर खरेदीस प्राधान्य देत होते. मात्र, मागील वर्षी कोरोना संसर्गानंतर घर खरेदीदारांची मानसिकता बदलली आहे. लोकांना आता शहराबाहेर मोकळ्या हवेशीर वातावरणात घर पाहिजे आहे. असे अनेक ग्राहक आहेत त्यांना कमी बजेटमध्ये घर हवे आहे. या ग्राहकांचाही विचार करून शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प उभारत आहेत.
आरोग्याच्यादृष्टीने मोकळे वातावरण फायदेशीर
सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, कोरोनाच्या आधी घर खरेदीत जी प्राथमिकता होती, ती म्हणजे फायनान्सियल प्राथमिकता असे. मला पैसे वाचवायचे आहेत,मला स्वत:ची मालमत्ता करायची आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गानंतर लोकांची प्राथमिकता आरोग्याकडे स्थलांतरित झाली. घराच्यादृष्टीने बघितले की, आधी घराची मागणी पर्यायी होती, ती आता अत्यावश्यक झाली आहे. कारण, कोरोनामुळे गजबजलेल्या भागात राहणे आता अतिशय घातक झाले आहे, त्यामुळे एक स्वच्छ व सुंदर परिसर असावा, ज्यातून निरोगी राहता यावे, ही आता गरज झाली आहे, लक्झरी राहिली नाही. ग्राहकांच्या बदललेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याअनुषंगाने कोरोनानंतर बांधकाम व्यावसायिकांनी स्वच्छ, सुंदर व मोकळ्या शुद्ध वातावरणात किफायतशीर प्रकल्प पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात उभारणे सुरू केले आहे. आरोग्याप्रति लोक जागरूक झाले आहेत. यामुळेच आता संसर्गाच्या वातावरणातही आपल्या कुटुंबाला सुखरूप ठेवण्यासाठी शहराबाहेर प्रकल्पात घर खरेदी करणे यास प्राधान्य दिले जात आहे.
आजपेक्षा भविष्यात किमती वाढणारच
मागील वर्षी लॉकडाऊन काळात पुरवठा साखळी ब्रेक झाली होती. अनलॉक काळात मागणी वाढली, पण पुरवठा न वाढल्याने भाज्यांपासून ते सिमेंटपर्यंत सर्व काही महागले होते. मागणी व पुरवठामधील तफावत ज्या ज्या वेळीस निर्माण होते त्या वेळी महागाई वाढतेच. या अनुषंगाने ग्राहकांना आज घर खरेदी करणे कधीही स्वस्त ठरणार आहे. कारण, भविष्यात किमती अजून वाढणार आहेत. आपण मागील ५० वर्षांचा अभ्यास केला तर घरांच्या किमती वाढतच आहेत, कमी झालेल्या नाहीत, हे लक्षात येईल.
हक्काचे घर खरेदी करण्यातच दूरदृष्टी
शहरात सध्या १० लाखांपासून घरे उपलब्ध आहेत. गृहकर्जाचे व्याजदर सर्वांत नीचांकी पातळीवर येऊन ठेपले आहेत. ६.८५ ते ८ टक्के व्याजदरादरम्यान कर्ज मिळत आहे. महिलांच्या नावावर घर खरेदी केले तर राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख रुपयांची सवलत मिळत आहे. याशिवाय कमी डाउनपेमेंटवर घराचे बुकिंग करता येत आहे. या बाबी घर खरेदीत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. भाड्याच्या घरात राहून भाडे भरण्यापेक्षा स्वत:च्या घरात राहून बँकेचे हप्ते भरणे योग्य आहे. सरकारी सवलती, बँकेचे कमी व्याजदर भविष्यात राहतील की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. मात्र, आताच्या काळात हक्काचे घर खरेदी करण्यातच दूरदृष्टीचा निर्णय ठरू शकतो.
(रविवार रियल इस्टेट पुरवणीसाठी मॅटर)