हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जवळपास दीड वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रशासनाकडून तेच ते रटाळ उत्तर दिले जात असल्यामुळे तसेच वरिष्ठ अधिकार्यांचे अन्य अधिकार्यांवर नियंत्रण नसल्याचे सांगून संतप्त झालेल्या काँग्रेस-राष्टÑवादीच्या सदस्यांनी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेतून बाहेर निघून जाणे पसंत केले. जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, सीईओ पी. व्ही. बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, शिक्षण सभापती रंगराव कदम, समाजकल्याण सभापती मधुकर कुरूडे, कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, महिला व बालकल्याण सभापती निलावती सवंडकर यांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्तांवरील अनुपालावर चर्चेला सुरूवात झाली. या चर्चेच्या वेळी ८ गावे गाडीबोरी पाणीपुरवठा योजना, २० गावे पुरजळ पाणीपुरवठा योजना व २३ गावे सिद्धेश्वर पाणीपुरवठा योजना या ३ योजना शिखर समितीला चालविण्यास देण्यासंदर्भात गेल्या सभेत झालेल्या ठरावावर काय कारवाई करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर अधिकार्यांनी शिखर समितीच्या बैठका सुरूच असल्याचे सांगून योजना हस्तांतराची कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर सेनगाव येथील ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा ठराव गेल्या दीड वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. यावर काय कारवाई झाली? असा सवाल उपस्थित करण्यात आला असता, पोलिस अधीक्षकांकडून अतिक्रमण हटविण्यासाठी बंदोबस्त दिला जात नसल्याचे अधिकार्यांनी कारण सांगितले. हेच कारण गेल्या ३ ते ४ सभांपासून अधिकारी सांगत आहेत, मग कारवाई का होत नाही? असा सवाल काँग्रेसच्या सदस्यांनी केला असता, अधिकार्यांनी पुन्हा हतबलता दाखविली. जवळा बाजार येथील इंदिरा गांधी कन्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून संगणक खरेदीसाठी सक्तीने पैसे घेण्यात आले. याबाबत काय कारवाई करण्यात आली? असा सवाल जि. प. सदस्य मुनीर पटेल यांनी केला असता त्यावरही अधिकार्यांकडून गोल-गोल उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील आरोग्य परिचारिकेने खोटा अहवाल दिल्याबद्दल काय कारवाई केली? असा सवाल जि. प.सदस्य चंद्रकांत हराळ यांनी केला. यावर संबंधितांना ताकीद दिली असल्याचे सांगितले. याचवेळी हराळ यांनी साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रांत रूग्णांची हेळसांड केली जाते, वेळेवर उपचार केले जात नाहीत, काही दिवसांपूर्वी या आरोग्य केंद्रात एका मयताचे शवविच्छेदन करण्यास वैद्यकीय अधिकार्यांनी अक्षम्य दिरंगाई केली. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी हराळ यांनी केली. या मागणीला काँग्रेसचे सदस्य विनायक देशमुख, द्वारकादास सारडा, राष्टÑवादीचे मुनीर पटेल, अपक्ष बाबा नाईक आदींनी सहमती दर्शविली. तरीही अधिकार्यांकडून उत्तरांची टोलवाटोलवी सुरूच होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस- राष्टÑवादी व अपक्ष सदस्यांनी सत्ताधारी पदाधिकार्यांनी या प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. जि. प. सीईओ पी. व्ही. बनसोडे यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने वरिष्ठ अधिकार्यांचे जिल्हा परिषदेतील अन्य अधिकार्यांवर कसलेही नियंत्रण नाही, सत्ताधारी पदाधिकारी अधिकार्यास जाब विचारण्यास तयार नाहीत, पाणी पुरवठा योजना असो की, इंदिरा कन्या शाळेचे चौकशी प्रकरण असो की, कापडसिंगी येथील परिचारिकेवरील कारवाईचे प्रकरण असो की, सेनगाव येथील अतिक्रमण हटविण्याचे प्रकरण असो. प्रत्येक वेळी तेच ते रटाळ उत्तर अधिकारी देत आहेत. दीड वर्षांपासून प्रश्न उपस्थित करूनही कारवाई होत नसेल तर सभागृहात बसण्याची आवश्यकताच काय? असा सवाल करून काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या सदस्यांनी तातडीने सभात्याग केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते मुनीर पटेल यांनी अधिकारी व पदाधिकार्यांवर आरोप केला. सत्ताधारी पदाधिकार्यांचे अधिकार्यांवर कसलेही नियंत्रण नाही, असे सांगून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांचाही अधिकार्यांवर धाक नाही. त्यामुळे अधिकारी कोणाचेही ऐकण्यास तयार नाहीत, असा आरोप केला. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनिल कदम म्हणाले की, सत्ताधारी पदाधिकार्यांनी विकासाच्या बाजूने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही प्रश्नांसंदर्भात मात्र अधिकार्यांच्या चुका असल्याची त्यांनी कबुली दिली. सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी साहेबराव कांबळे, डी. जी. पंडीत, एस. व्ही. गोरे, आर. एस. बजाज, एस. आर. बेले, कक्ष अधिकारी जे. एम. साहू यांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी) विरोधी पक्षातील सदस्य सभागृहांमधून निघून गेल्यानंतर शिवसेनेचे गटनेते अनिल कदम यांनी जिल्ह्यातील पांदण रस्त्यासंदर्भात ठराव मांडला. त्यामध्ये लोकसहभागातून तयार केल्या जाणार्या पांदण रस्त्यांना शासकीय मंजुरीचा क्रमांक मिळावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. या मागणीला जि.प.सदस्य सचिन देशमुख यांनी अनुमोदन दिले. अन्य सदस्यांनी या ठरावाला प्रतिसाद दिला. सेनगाव येथील ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने चर्चेला आणला जात असताना या प्रकरणी जि.प.कडून ठोस कसलीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप. साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास वैद्यकीय अधिकार्यांनी दिरंगाई केली असतानाही वरिष्ठ अधिकार्यांकडून संबंधिताला पाठीशी घातले जात असल्याची तक्रार. पुरजळ, गाडीबोरी, सिद्धेश्वर या तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाची अनास्था. जवळा बाजार येथील इंदिरा कन्या शाळेकडून संगणक खरेदीसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आली असल्याची तक्रार करूनही जि.प.च्या अधिकार्यांकडून कारवाई केली जात नसल्याचा जि.प. सदस्य मुनीर पटेल यांचा आरोप. कापडसिंगी येथील आरोग्य केंद्रातील परिचारिकेने खोटा अहवाल दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तालुका आरोग्य अधिकार्यांनी सदरील परिचारिकेस ताकीद देऊन पाठीशी घातल्याचा जि.प. सदस्य हराळ यांचा सर्वसाधारण सभेत आरोप.
ठरावांवरील रटाळ उत्तरांमुळे काँग्रेस-राष्टÑवादीचा सभात्याग
By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST