औरंगाबाद : मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे मंजूर केल्यामुळे सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला; पण त्याआधी हा ठराव मांडताना भाजपच्या नगरसेवकांनी अप्रत्यक्षपणे सेनेच्या नेत्यांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. त्यामुळे सेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन दिवसांपूर्वीच १८ हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. हा निधी मंजूर केल्याबद्दल मनपाच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी गडकरींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यामुळेच हा निधी मिळाला. आतापर्यंत अनेक जण केवळ दावेच करीत होते; पण कुणालाही ते शक्य झाले नाही, अशा शब्दात भाजपच्या नगरसेवकांनी सेनेच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निष्क्रियतेचा ठपका ठेवला. त्यामुळे सेनेचे नगरसेवक चांगलेच खवळले. सेनेकडून सभागृह नेता राजेंद्र्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, विकास जैन, नंदकुमार घोडेले आदींनी त्यावर आक्षेप घेतला. केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असतात़ खा. चंद्रकांत खैरे यांनीही समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना शहरासाठी मंजूर करून आणली. रस्त्यांचाही त्यांनी पाठपुरावा केला़ त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे सेनेच्या नगरसेवकांनी सुनावले. त्यावर भाजपचे बापू घडामोडे यांनी समांतरचे नाव काढू नका, खोलात गेलात तर उलटा कार्यक्रम लागेल, असा इशारा दिला. त्यामुळे हा वाद आणखीनच भडकला. दोन्ही बाजूंनी नगररसेवक जागेवर उभे राहून एकमेकांवर आरोप करीत गेले. आजच्या सभेतही बराच वेळ पुरुष नगरसेवकच बोलत होते. कुणी महिला बोलण्यासाठी उभी राहिली की तिला ताई दोन मिनिटे असे म्हणून खाली बसविण्यात येत होते. हा प्रकार बराच वेळ चालत होता. त्यामुळे शेवटी भाजपच्या माधुरी अदवंत यांनी जागेवर उभे राहून कडक शब्दात सुनावले. ४आम्ही इथे तुमची भाषणे ऐकायला येत नाही, आम्हालाही बोलायचे असते, आतापर्यंत आम्ही तुमचे ऐकले, आता आम्हाला बोलू द्या, असे अदवंत म्हणाल्या; पण त्यानंतर नंदकुमार घोडेले बोलत होते. त्यामुळे अदवंत यांनी आता तुम्ही खाली बसला नाहीत तर सभागृहात एकही महिला नगरसेविका थांबणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला.