खडकी सोडियेला मोटा। अजीचा दहीकाला गोमटा ।।
घ्यारे घ्यारे दहिभात। आम्हा देतो पंढरीनाथ ।।
एकीकडे सूर्य माळवतीला जात असताना दुसरीकडे नाथमंदिरात भानुदास एकनाथच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या आवाजात षष्ठीमहोत्सवाची काला दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते फोडण्यात आली अन् नाथषष्ठी सोहळ्याची रविवारी सांगता झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैठणचा नाथषष्ठी उत्सव रद्द करून प्रशासनाने षष्ठीतील धार्मिक कार्यक्रम मोजक्या मानकऱ्यांसह घेण्याची परवानगी दिली होती. रविवारी काला दहीहंडीसाठी फक्त २० मानकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. वारकरी-फडकरी व भाविकांनी आपापल्या घरी काला दहीहंडी साजरी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे वारकऱ्यांनी आपापल्या संस्थानात काल्याचे कीर्तन करून फडावरच दहीहंडी फोडली. प्रसादाचे वाटप करून तेथूनच नाथांचे दर्शन घेतले. रविवारी सायंकाळच्या दरम्यान मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. पालखी ओटामार्गे वाळवंटातून दिंडी नाथमंदिरात दाखल झाली. दरम्यान, याच वेळेस कृष्ण दयार्णव महाराज व ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांचीही दिंडी नाथ मंदिरात दाखल होत असते. मात्र यंदा या दोन्ही दिंड्या निर्बंधामुळे येऊ शकल्या नाही.
मंदिरात मोजक्याच भाविकांनी रिंगण करून पाउल्या खेळल्या. महिला भाविकांनी फुगड्या खेळून आपली सेवा अर्पित केली. मोजकेच वारकरी मंदिरात हजर असल्याने मंदिरातील जल्लोषावर निर्बंधाचे सावट असल्याचे दिसून आले. शहरात महिला भाविकांनी दहीहंडीचा प्रसाद करून मंदिरातील दहीहंडी फुटताच आपल्या परिसरात एकमेकांना काल्याच्या प्रसाद वाटून काला दहीहंडी उत्सव साजरा केला.
छबिना पालखी मिरवणूक
शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून नाथ महाराजांच्या पादुकांची छबीना पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत नाथवंशजासह वारकरी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. पालखी गोदावरीच्या भेटीस नेण्यात आली व पुन्हा नाथमंदिरात दाखल झाली. दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सूरज लोळगे, तहसीलदार दत्ता निलावाड, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, उपजिल्हाधिकारी स्वप्निल मोरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची उपस्थिती होती. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
----
फोटो : नाथमंदिरातील काला दहीहंडी परंपरेनुसार ज्येष्ठ नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांनी फोडली. यावेळी उपस्थित मानकरी व प्रशासकीय अधिकारी.