औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे तेलवाडी गावापर्यंतचे रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कन्नड शहराला शहरापासून तीन किलोमीटर औरंगाबादकडे तर अंधानेर तेलवाडीसाठी बायपास रोड कन्नड टी पॉईंट येथून काढण्यात आला आहे. मात्र, महामार्गापासून कन्नडकडील वळणरस्ता अरूंद वळणामुळे धोकादायक बनला आहे. याच टी पॉईंटवरुन पाणपोईपासून शिवूरकडे जाण्यासाठी सर्विस रोड नसल्याने एकाच लेनवरून वाहनेविरुध्द दिशेने धावतात. यामुळे अपघाताची शक्यता आहे. दुसरीकडे औरंगाबादकडून कन्नडकडे जाणाऱ्या वाहनाला रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने सतत अपघात होतात. गेल्या दीड महिन्यांत येथे १४ अपघात घडल्याने या मार्गावर उपाययोजनांची गरज आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी कन्नड शहर ते रेल्वे उड्डाणपूल रस्ता रुंदीकरणासह होणे गरजेचे आहे. यास विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.
वाणिज्य वार्ता : कन्नड टी पॉईंटवरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजनेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST