औरंगाबाद : पश्चिम महाराष्ट्रातील उसापासून साखर बनते; मग मराठवाड्यातील उसापासून काय ‘मीठ’ तयार होते काय, असा संतप्त सवाल करीत बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) आर.पी. सुरवसे यांना घेराव घातला. मराठवाड्यावर नेहमी अन्याय होत आहे. उसाच्या दरातही भेदभाव केला जात असून पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाड्यातील उसाला समानभाव देण्यात यावा, अशी मागणी केली. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी शनिवारी अचानक क्रांतीचौक येथील प्रादेशिक सह-संचालक (साखर) यांच्या कार्यालयासमोर निर्दशने करणे सुरू केले. ‘पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातील उसाला समानभाव मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा ऊस उत्पादक देत होते.गंगाभूषण थावरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह-संचालक आर.पी. सुरवसे यांची भेट घेतली व मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना पहिला हप्ता २५३० रुपये, तर मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना १८०० रुपये टन भाव दिला जातो. हा भेदभाव कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला. जोपर्यंत साखर आयुक्तालयात आमचे निवेदन पोहोचले याचे लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयासमोरून हटणार नाही, असे म्हणत ऊस उत्पादकांनी सुरवसे यांना घेराव घातला. सुरवसे यांनी सांगितले की, ऊस दरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियामक समिती स्थापन केली आहे.साखर आयुक्तांच्या माध्यमातून समितीसमोर तुमचे निवेदन पोहोचविण्यात येईल, असे सुरवसे यांनी आश्वासन दिले; पण जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, या निर्णयावर ऊस उत्पादक ठाम राहिले. अखरे निवेदन पोहोचल्याचा पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयातून फॅक्स आला तेव्हाच उत्पादकांनी कार्यालय सोडले. यावेळी उपनिबंधक (सहकार) अनिलकुमार दाबशेडे यांची उपस्थिती होती.
साखर सहसंचालकांना घेराव
By admin | Updated: December 7, 2014 00:18 IST