आळंद : गेल्या आठ दिवसांपासून अचानक थंडी गायब होवून ढगाळ वातावरण तयार झाल्याने आळंद व परिसरातील गहू, हरभरा, मक्यासह इतर रबीची पिके धोक्यात आली आहेत. याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावल्याने जलसाठे तुडुंब भरले. फुलंब्री तालुक्यातील आळंद, उमरावती, जातवा, नायगव्हान, पिंपरी, सताळ, खामगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, बाजरीसह इतर रबी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्याने ती पिकास अनुकूल असल्याने पिके जोमात होती. मात्र, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वाढली आहे. याचा परिणाम रबी पिकांवर होत असून मका, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत कृषी विभागाकडून अद्यापही शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच नेमकी कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत कळविण्यात आलेले नाही. ओल्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान तर आता ढगाळ वातावरणामुळे रबी पिकांच्या उत्पन्नातसुद्धा घट होण्याचे संकेत दिसत आहे. लागवडीसाठी केलेला खर्चही निघेल की नाही, याबाबत सध्या सांगता येत नसल्याने शेतकरी अडचणी आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने गावनिहाय मेळावे घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
--- कॅप्शन : आळंदसह परिसरात रबी हंगामातील मका पिकांवर ढगाळ वातावरणामुळे असा अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.