औरंगाबाद : पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी मुकुंदवाडी, सिडको, जवाहरनगर व गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची खांदेपालट केली. या शिवाय आयुक्तालयातील गुन्हेशाखेचे विभाजन करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. शहरातील वाढता गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आयुक्तालयात असलेल्या गुन्हे शाखेची दोन भागात विभागणी करण्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे गुन्हे शाखा झोन-१ व गुन्हे शाखा झोन-२ या पद्धतीने काम करील. याशिवाय गुन्ह्यांच्या तपासाची स्पर्धाही लागेल. ज्यामुळे ‘डिटेक्शन’चा आलेख वाढेल, असा आयुक्तांचा कयास आहे. गुन्हे शाखेच्या झोन-१ च्या निरीक्षकपदाची धुरा आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे, तर झोन-२ च्या निरीक्षकपदाची धुरा सिडको ठाण्याचे निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निरीक्षक हेमंत कदम यांची सुरक्षा विभागात तर जयकुमार चके्र यांची नियुक्ती पोलीस कल्याण विभागात करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार निरिक्षक गौतम पातारे यांच्याकडे सोपवण्यात आला. आयुक्तालयातील सध्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर थोरात यांची नियुक्ती विशेष शाखेत करण्यात आली असून, विशेष शाखेचे निरीक्षक बोरसे यांच्याकडे वाहतूक शाखा सोपविण्यात आला आहे. सिडको ठाण्याच्या निरीक्षकपदी पोलीस कल्याण विभागाचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, तर मुकुंदवाडी ठाण्याच्या निरीक्षकपदी नुकतेच लातूर येथून बदलून आलेले प्रेमसागर चंद्रमोरे यांची वर्णी लावण्यात आली आहे. जवाहरनगर ठाण्याच्या निरीक्षकपदी जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र येथून बदलून आलेले शेख सलीम अब्दुल रहीम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सहा. निरिक्षक कृष्णा शिंदे यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली.
शहर गुन्हे शाखेचे विभाजन
By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST