छत्रपती संभाजीनगर : ड्रग पेडलर्सच्या घरात छापा मारण्यासाठी गेलेल्या एनडीपीएस पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा महिला आरोपींना शनिवारी रात्री ठाण्यात हजर राहण्याच्या अटीवर नोटिसीवर सोडण्यात आले होते. मात्र, या सहा महिला आरोपी रविवारी पसार झाल्याचे उघडकीस आले.
जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादी गुन्हे शाखेच्या अंमलदार संजीवनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी एनडीपीएस सेलच्या प्रमुख पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार मारोती गोरे यांच्यासह पथक नशेच्या गोळ्या विक्री करणारा सराईत गुन्हेगार अब्रार शेखच्या घरी छापा मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अब्रार शेख ऊर्फ मारी याला वाचविण्यासाठी घरातील सहा महिलांनी पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला चढविला. मिरचीची पावडर पाण्यामध्ये कालवून पाणी पोलिसांच्या डोळ्यात फेकले. त्यामध्ये निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक मस्के, अंमलदार गोरे जखमी झाले.
आरोपी नाझिया शेख हिने लोखंडी माप निरीक्षक बागवडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने फेकून मारले. तसेच पोलिस अधिकारी, अंमलदार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. नशेच्या गोळ्या विक्री करण्याकरिता त्यांच्या राहत्या घराचा वापर करू देत मदत केली. हल्ला होताच बागवडे यांनी नियंत्रण कक्षाकडून अधिक पोलिस कुमक मागवून घेतली. नंतर गुंगीकारक नशेच्या गोळ्या जप्त केल्या. तसेच महिला आरोपींना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. महिलांना रात्री अटक करीत नसल्यामुळे हजर राहण्याच्या अटीवर नोटीस देऊन सोडले. महिला आरोपी घरी गेल्यानंतर रातोरात पसार झाल्या. या महिलांचा जिन्सी पोलिस शोध घेत आहेत.