जालना : शेतकऱ्यांना दुष्काळी पॅकेज तात्काळ द्या, या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवारी शासकिय विश्रामगृहावर रूम्हणे काढण्यात आला. दरम्यान, विश्रामगृहात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना या संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले. गांधीचमन येथून निघालेल्या या मोर्चात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पॅकेज तात्काळ मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. बऱ्याच आंदोलकांच्या हातात रुम्हणे होते. कर्जमाफी, नव्याने कर्ज पुरवठा, हेक्टरी अनुदान, फळबागांना विशेष पॅकेज, वीज बिल, पाणीपट्टी, शैक्षणिक शुल्क माफ करणे, सर्व प्रकारची सिंचनाची कामे हाती घेणे, मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्या मांडल्या. मोर्चा शनिमंदिर, नूतन वसाहत उड्डाणपूल, अंबड चौफुली मार्गे शासकिय विश्रामगृहावर पोहोचला. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना नानासाहेब जावळे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत न केल्यास मंत्र्यांची गाडी रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशाराही दिला. या आंदोलनात नानासाहेब जावळे, भीमराव मराठे, विजय घाडगे, अप्पासाहेब कुढेकर, विलास उढाण, देवकर्ण वाघ, गणेश पघळ, राधाकिसन शिंदे, गायकवाड, विलास कोल्हे, शिंदे, पंकज जऱ्हाड, विजय शिंदे, मच्छिंद्र घोगरे, शरद बोबडे, संतोष जाधव, मोरे, सतीश कुढेकर, शिरसाठ, उफाड, खोजे, कोकणे, गुजर, मिसाळ आदी सहभागी झाले होते. या मोर्चानिमित्त पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)
छावा मराठा युवा संघटनेचा रुम्हणे मोर्चा
By admin | Updated: December 31, 2014 01:01 IST