छत्रपती संभाजीनगर : मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (४५) यांची त्यांच्याच घरात गळा, कान, दोन्ही हातांच्या नसा कापून, डोके फोडून क्रूर हत्या करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी घडलेल्या घटनेत अखेर चार वर्षे एक महिन्यानंतर विधिसंघर्ष मारेकऱ्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. बुधवारी त्याला जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. बालसुधारगृहातून हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश न्यायमूर्ती एन. एस. मोमीन यांनी दिले.
शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या शिंदे यांच्या क्रूर हत्येने राज्यभर खळबळ उडाली होती. १० ऑक्टोबर रोजी शिंदे रात्री ११:३० वाजता घरी परतले होते. हॉलमध्ये झोपलेल्या शिंदे यांचा पहाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. हत्येनंतर तब्बल नऊ दिवस या हत्येचे गूढ कायम होते. तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सखोल तपास करत १८ ऑक्टोबर रोजी एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. तपासात ही हत्या नियोजनबद्ध व निर्घृणपणे केल्याचे पोलिसांनी सिद्ध केले.
जेजे ॲक्टचा आधार, अल्पवयीन मारेकऱ्याला प्रौढ समजण्यास मंजुरी– १७ वर्षे ८ महिने वय असलेला विधिसंघर्ष बालक हा कायद्याचा अभ्यासक होता. तपास अधिकाऱ्यांनी जेजे ॲक्टमधील नियम १० (५) अन्वये हा गुन्हा गंभीर, अघोरी पद्धतीने केल्याने विधिसंघर्ष मुलास प्रौढ समजण्यात यावे, यासाठी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी बालन्याय मंडळासमोर अहवाल सादर केला होता.– त्यानंतर ६० दिवसांच्या आत १६ डिसेंबर २०२१ रोजी दोषारोपपत्र सादर करण्यात आले. बालमंडळाच्या अध्यक्षांनी प्राथमिक मूल्यांकन करीत सदर अहवाल सादर करून मुख्य न्यायाधीशांकडे पाठवला. मुख्य न्यायाधीशांनी ७ जानेवारी २०२२ रोजी सदर मुलास प्रौढ समजत खटला सत्र न्यायालयात चालवण्यास मान्यता दिली.
४ वर्षे १ महिना २९ दिवसांनंतर ‘तो’ ठरला दोषीजानेवारी २०२२ पासून या हत्येच्या गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरू होती. ४३ खंड, ५९१ पानांचे दोषारोपपत्र सादर केले होते. यात मुख्य ७५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यानंतर १० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी त्याला जन्मठेप व १ हजार रुपये दंड ठोठावण्याची शिक्षा सुनावली.
डंबेलने केले वार, २५ फूट खोल पाण्यातून मिळवले पुरावेमारेकऱ्याने वैयक्तिक वादातून राजन शिंदे यांची हत्या केली होती. ते झोपेत असताना व्यायामासाठीचे वजनदार डंबेल पाच वेळा पाठीमागून डोक्यात मारत, चाकूने गळा कापून, डंबेलने कपाळ, कान, डोळ्याजवळ, चेहरा व मानेवर वार करून दोन्ही हातांच्या नसा कापून हत्या केल्याचे पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी सिद्ध केले. हत्येचे पुरावे मारेकऱ्याने घराजवळीलच विहिरीत फेकले होते. पोलिसांनी २५ फूट खोल पाण्यातून हे पुरावे जप्त केले होते.
Web Summary : Dr. Rajan Shinde's brutal 2021 murder case concludes with the juvenile perpetrator receiving a life sentence. The court recognized the heinous nature of the crime, tried the minor as an adult, and convicted him based on substantial evidence, including recovered weapons.
Web Summary : डॉ. राजन शिंदे की 2021 की क्रूर हत्या के मामले में किशोर अपराधी को आजीवन कारावास की सजा सुनाई गई। अदालत ने अपराध की जघन्य प्रकृति को पहचाना, नाबालिग पर वयस्क के रूप में मुकदमा चलाया और बरामद हथियारों सहित पर्याप्त सबूतों के आधार पर उसे दोषी ठहराया।