छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने आज, सोमवारी सकाळपासूनच दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई सुरू केली आहे. दिल्ली गेट, हिमायत बाग, मौलाना आझाद महाविद्यालय परिसर, हडको कॉर्नर इ. भागात ३० मीटरच्या आत येणारी अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत. ४०० ते ४५० मालमत्ताबाधित होण्याची शक्यता आहे. अनेक मालमत्ताधारकांनी रविवारी स्वत:हून आपली बांधकामे, साहित्य काढून घेतले.
महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाची नागरिकांनी अक्षरश: धास्ती घेतली आहे. महापालिकेच्या इतिहासात एवढी मोठी कारवाई कधीच झाली नाही. आतापर्यंत साडेतीन हजार अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. चार रस्ते २०० फूट रुंद करण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता म्हणजे दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट होय. जुन्या विकास आराखड्यात रस्ता ३० मीटर रुंद दर्शविला आहे. नवीन आराखड्यात तो ३५ मीटर आहे. मनपा सध्या ३० मीटरच्या आत येणारी अनधिकृत बांधकामे पाडणार असून आज, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली.
कारवाईसाथी १५ जेसीबी, ४ पोकलेनमनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मोहिमेचे संपूर्ण नियोजन केले आहे. या कारवाईतही पाच टीम राहतील. प्रत्येक टीम प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर कारवाई करणार आहे. मनपाच्या यांत्रिकी विभागाने १५ जेसीबी, ४ पोकलेन, १ लाँगरिच पोकलेन, १५ टिप्पर, २ अग्निशमन बंब, २ ॲम्ब्युलन्स, २ विद्युत विभागाचे हायड्रोलिक लॅडर, २ कोंडवाडा पथकाची वाहने दिली आहेत. महापालिका आणि पोलिसांचे पथक संयुक्तरीत्या कारवाई करणार आहे.
हर्सूल टी पॉइंट ते वसंतराव नाईक चौक१) हर्सूल टी पॉइंटपासून मनपाचे पथक जळगाव रोडवर कारवाई करणार आहे. या रस्त्यावर वसंतराव नाईक चौक ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत एकाच बाजूने सर्व्हिस रोड आहे. दुसऱ्या बाजूने सर्व्हिस रोडच नाही.२) वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागतो. मागील दहा वर्षांपासून सर्व्हिस रोड करावा, अशी मागणी आहे. मनपाने यापूर्वी मयूर पार्क, आंबेडकरनगर भागातील अतिक्रमणे काढली होती.३) काही कंपन्या, मोठ्या मालमत्ताधारकांनी सर्व्हिस रोडसाठी जागा दिली नव्हती. त्यामुळे ही मोहीम थांबली होती. उद्याच्या कारवाईत सर्व्हिस रोड मोकळा होऊ शकतो.