छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज होत असलेल्या मतदानादरम्यान शहरात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांच्या बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला, तर काही ठिकाणी राजकीय चुरशीतून निर्माण झालेला तणाव पोलिसांनी वेळीच हाताळला.
ब्रिजवाडीत यंत्रांचा खेळ; उमेदवारांचा आक्षेप प्रभाग क्रमांक ९ मधील ब्रिजवाडी महापालिका शाळेत मतदानादरम्यान मोठा गोंधळ उडाला. येथील बूथ क्रमांक ५ मधील ईव्हीएम मशीन पूर्णपणे बंद पडली, तर बूथ क्रमांक ४ मधील यंत्रातही तांत्रिक बिघाड झाला. यामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश पटेकर यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून, मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तांत्रिक दुरुस्तीनंतर येथील मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. असाच प्रकार ज्ञानप्रकाश विद्या मंदिर केंद्रावरही पाहायला मिळाला, जिथे ईव्हीएमची जोडणी उलट क्रमाने (अ-ब-क-ड ऐवजी ड-क-ब-अ) केल्यामुळे उमेदवारांनी तीव्र आक्षेप घेतला.
नारेगावात पोलीस आयुक्तांचा दणका नारेगाव येथील मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त स्वतः दाखल झाले. यावेळी केंद्राच्या आत मोबाईल वापरणाऱ्या प्रतिनिधींवर त्यांनी कठोर कारवाई करत त्यांचे मोबाईल जप्त केले आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (ITI) विनाकारण थांबलेल्या राजकीय प्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी तंबी देऊन बाहेर काढले. नारेगाव परिसरात रात्रीच्या राड्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
पाणी सुटलं, गर्दी ओसरली! प्रभाग १४ मध्ये एक वेगळीच अडचण समोर आली. सकाळच्या सुमारास नळाला पाणी आल्याने अनेक मतदारांनी मतदानाऐवजी पाणी भरण्याला प्राधान्य दिले, परिणामी मतदान प्रक्रिया काही काळ संथ झाली. मात्र, दुपारनंतर पाण्याचा प्रश्न मिटल्यावर मतदानाची टक्केवारी पुन्हा वाढू लागली आहे. सध्या शहरात सर्वत्र शांततेत मात्र चुरशीने मतदान सुरू आहे.
Web Summary : Aurangabad's municipal election faced hurdles: EVM malfunctions disrupted voting at some booths. Water supply issues in ward 14 also briefly slowed the process. Police addressed tensions, ensuring largely peaceful polling.
Web Summary : औरंगाबाद महानगरपालिका चुनाव में ईवीएम की खराबी और पानी की समस्या से मतदान धीमा हो गया। वार्ड 14 में पानी आने से लोगों ने मतदान छोड़कर पानी भरने को प्राथमिकता दी। पुलिस ने तनाव को संभाला, शांतिपूर्ण मतदान जारी।