- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील घाटनांद्रा येथील संस्कार बियरबार मध्ये २२ महिन्यापासून स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या तरुणाने भावाच्या लग्नासाठी पैसे लागत असल्याने २ लाख ८६ हजार रुपयांचा थकीत पगार मागितला. मात्र, बियरबारच्या मालक आणि मॅनेजरने पैसे न देता गुप्तांग ठेचून लाठ्याकाठ्याणी बेदम मारहाण करून स्वयंपाकी तरुणाचा खून केला. अतूल प्रल्हाद पाडळे ( २१, रा.वाकडी ता. भोकरदन जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन ४ एप्रिल रोजी मध्यरात्री ११ वाजता अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा, बेदम मारहाण करून खून केल्या प्रकरणी बियरबारच्या मालक आणि मॅनेजर या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने अतुल पाडळे हा घाटनांद्रा येथील हॉटेल संस्कार बियरबारमध्ये स्वयंपाकी म्हणून २०२३ पासून १३ हजार रुपये महिन्याप्रमाणे काम करत होता. भावाच्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे महिन्याचा पगार न घेता एकदम सर्व रक्कम द्यावी, असे अतुल याने बियरबार मालक मनीष जयस्वाल याच्यासोबत ठरवले. दरम्यान, गुडीपाडव्याला अतुल घरी वाकडी येथे गेला असता त्याला आई अलकाबाईने आता भावाच्या लग्नासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यामुळे हॉटेलवर परत येताच ३० एप्रिल रोजी अतुलने हॉटेल मालकाकडे ठरल्याप्रमाणे एकत्रित पगार देण्याची मागणी केली. मात्र, मालक मनिष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी ( दोघे रा. घाटनांद्रा ता.सिल्लोड ) यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद झाल्याने दोघांनी अतुलला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. डोळा फोडून, गुप्तांग ठेचून अतुलचा हॉटेल मालक व मॅनेजरने निर्घृणपणे खून केला.
आकस्मिक मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगितलेदरम्यान, माहिती मिळताच आई अलकाबाई व वडील प्रल्हाद व भाऊ मंगेश घटनास्थळी आले. असता हॉटेल मालकाने त्याचा अकस्मित मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर अतुलला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू बेदम मारहाण करून गुप्तांग ठेचल्याने झाल्याचे उघडकीस आले. अतुलच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात ३० एप्रिल रोजी वाकडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर ४ मे रोजी रात्री अतुलचे वडील प्रल्हाद यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि इतर कलमांच्या खाली मालक मनिष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना आज, सोमवारी दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेश कोल्हे, फौजदार लहू घोडे करत आहेत.