फुलवळ : दीड महिन्यापूर्वी कंधार तालुक्यात झालेल्या गारपीटीने अनेकांचे नुकसान झाले़ घरपडीचा सानुग्रह म्हणून प्रत्येकी १९०० रुपये मंजूर झाले़ ही रक्कम चेकच्या स्वरुपात देण्यात येत असून बँकेत खाते काढणे, तालुक्याची वारी यासाठी हजारावर खर्च होत आहे़ त्यामुळे उर्वरित रक्कम नावालाच उरत आहे़ फुलवळसह कंधार तालुक्यातील परिसरात गेल्या ६ मार्च रोजी गारपीटीने चांगलेच थैमान घातले होते़ त्यातच झालेल्या घरपडीचे नुकसान पाहता महसूल विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान मंजूर झाले असून फुलवळमध्ये झालेल्या नोंदीत ११ घरांचा समावेश आहे़ त्या-त्या कुटुंब प्रमुखांच्या नावाने मंजूर झालेले चेक फुलवळ येथील सरपंच शिवहार मंगनाळे, सज्जाचे तलाठी प्रभाकर बोडावार यांनी १८ मे रोजी चेक वाटपास सुरुवात केली़ गारपीटीमुळे व वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होवून घरांचे नुकसान झाले होते़ त्यावेळी शेतीच्या नुकसानी बरोबरच घराची पडझड झाल्याने घरांचा सर्व्हे करण्यात आला होता़ गावोगावी सर्व्हेसाठी स्थानिक ग्रा़पं़चे ग्रामसेवक व कंधार पं़स़चे उपअभियंता यांची सर्व्हेक्षणासाठी निवड करण्यात आली होती़ त्यांनी केलेल्या सर्व्हेप्रमाणे सदर घरपडी घरमालकांना आता सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे़ फुलवळमधून इस्माईल शेख फरीज पिंजारी, गोविंद लक्ष्मण पांचाळ, गोविंद हणमंत मंगनाळे, शंकर गंगाधर शेंबाळे, सुरेश विठ्ठल बसवंते, बुद्धजी संभाजी बसवंते, मोकिंद तुकाराम देवकांबळे, अनुसया गंगाधर मंगनाळे, लक्ष्मण पुंडाजी बसवंते, विठ्ठल गोविंद बनसोडे व भीमराव संभाजी बसवंते या ११ घरांचा समावेश आहे़ तर मुंडेवाडी या गावातून ज्ञानोबा बालाजी मुंडे, तिरुपती व्यंकोबा मुंडे, किशन माधव मुंडे, हरिश्चंद्र देवराव मुंडे, पांडुरंग एकनाथ मुंडे, दिगंबर गंगाराम मुंडे, अंगद रामराव मुंडे, बालाजी दाजीबा मुंडे, सदाशिव ग्यानोबा मुंडे व रामराव सटवा मुंडे या दहा जणांच्या घरांचा समावेश आहे़ सर्व्हेनुसार सर्वांची घरे सारखीच पडली का, किंवा सर्वच घरांचे नुकसान समानच झाले होते का, जर समान नुकसान झालेच नसेल तर सर्वांनाच समान अनुदानाची रक्कम कशी काय, असे प्रश्न चर्चिले जात आहेत़ मंजूर झालेल्या अनुदानाच्या रकमेचा विचार करता १९०० रुपयांपैकी केवळ ७५० रुपयेच पदरात पडतात, तर मग ७५० रुपयांमध्ये घरांची दुरूस्ती कशी करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शिवाय रक्कम चेकच्या स्वरुपात असल्याने ती वठवण्यासाठी बँकेत जावे लागणार आहे़ (वार्ताहर)
घरपडी सानुग्रहाचे चेक वाटप
By admin | Updated: May 19, 2014 00:18 IST