मोहन बोराडे, सेलू शहरातील महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असल्यातरी अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकार्यांवर कारभार सुरू आहे़ तसेच अनेक कार्यालयातील प्रमुख अधिकारी रजा घेवून बदलीच्या तयारीला लागले आहेत़ सेलू शहरातील पंचायत समिती, नगरपालिका, तहसील कार्यालय या प्रमुख कार्यालयातील गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व तहसीलदार प्रभारी आहेत़ राजकीय सत्तासंघर्षामुळे सेलू शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी हैराण झाले आहेत़ परिणामी बदलीच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे़ मागील एक वर्षापासून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत़ विशेष म्हणजे, गटविकास अधिकारी हे पद वर्ग १ चे असतानाही कार्यालयातीलच विस्तार अधिकारी तुळशीराम राठोड हे एक वर्षा पासून प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत़ पालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पाठक यांनी काही दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यामुळे इतर शहराच्या मुख्याधिकार्यांकडे सेलूचा पदभार देण्यात आला आहे़ या ठिकाणीही नवीन मुख्याधिकारी येण्यास इच्छुक नाहीत़ काही महिन्यांपूर्वीच सेलू येथे तहसीलदार म्हणून रूजू झालेले पांडुरंग माचेवाड हे निवडणूक संपताच रजेवर गेले आहेत़ दरम्यान, ते इतर ठिकाणी बदली करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे तहसीलदारपदाची धुरा नायब तहसीलदार संदीप यादव लोणीकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे़ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत शिनगारे यांनी सेलू येथे तीन वर्षे सेवा बजावली आहे ते ही सुटीवर गेले असून परत येण्याची शक्यताही धुसर बनली आहे़ राजकीय हस्तक्षेप अनेक शासकीय कार्यालयात वाढत असल्यामुळे प्रमुख अधिकार्यांना काम करणे अवघड झाले आहे़ त्यामुळे अनेकवेळा प्रमुख अधिकारी पुढार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्यामुळे सेलू येथे पदभार नकोच अशी भूमिका अधिकार्यांची दिसून आली आहे़ वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सतीश बाहेती यांच्या बदलीनंतर या ठिकाणीही प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ शहरातील प्रमुख कार्यालयात प्रभारी अधिकार्यांवर जवाबदारी सोपविण्यात आली आहे़ दरम्यान मर्जीतील अधिकारी असलेल्यांकडेच पदभार सोपविला जात असल्याची चर्चा आहे़शहरातील प्रमुख कार्यालयात प्रभारी अधिकारी असल्यामुळे अनेक कामे खोळंबतात़ विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही़ परिणामी विकासकामांनाही यामुळे खीळ बसते़ वर्षानुवर्षे प्रभारी अधिकारीच कार्यरत असल्यामुळे कार्यालयातील इतर कर्मचार्यांवर वचक राहत नाही़ त्यामुळे शासकीय कामकाज ढेपाळते़ दरम्यान, शहरातील प्रमुख कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी मिळावेत अशी मागणी नागरिकांची आहे़
सेलू येथील प्रमुख कार्यालयात प्रभारीराज!
By admin | Updated: May 31, 2014 00:26 IST