औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी एवढीच आता औरंगाबादची ओळख राहिलेली नाही, तर येथे बहुभाषिक, बहुधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. शहरात १२ वस्त्यांंना जातींचे लेबल आहेत; परंतु राज्य सरकारच्या निर्णयानुसार हे लेबल लवकरच पुसले जाईल.
सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यात वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची देण्याची प्रथा बंद केली. वस्त्यांना जातींऐवजी महापुरुषांची अथवा समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, क्रांतीनर या प्रकारची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. वस्त्यांची नावे जातीवाचक असल्याने समाजात वेगळेपणाची भावना निर्माण होते. त्याचा परिणाम सामाजिक सलोख्यावर होतो. हे टाळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादेत औद्योगिक प्रगती साधतानाच शैक्षणिक संस्था, मॉल्स मल्टिप्लेक्सेस, हॉटेल्स, हॉस्पिटल आणि नवनवीन उद्योगसमूह शहरात सुरू होत आहेत. स्थानिक नागरिकांसोबतच परराज्यातील लोकही येथे काम करतात. शहरात जुन्या भागांसह गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या काही वसाहती, गल्ल्यांना आजही जातिवाचक नावे आहेत; परंतु सामाजिक सलोख्यात त्याचा आजवर कोणताही अडथळा आलेला नाही. प्रपंच करतानाच सामाजिक बांधिलकीही औरंगाबादकर जोपासत आहेत. सण,उत्सव असो की, एखादी सामाजिक परिस्थिती, अशावेळी प्रत्येक जाती, धर्माचे लोक एकत्र उभे राहिले आहेत. वसाहतींवरील जातीचे लेबल हटल्यानंतर सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन आणखी एकात्मता वाढण्यास मदत होईल.
शहरातील या आहेत वस्त्या
बंजारा कॉलनी, बौद्धनगर, ख्रिस्तनगर, सिंधी कॉलनी, बुऱ्हाणी कॉलनी, गवळीपुरा, भोईवाडा, कुंभारवाडा, कासारी बाजार, ब्राम्हण गल्ली, ढिवर गल्ली, बुरुड गल्ली.