चितेगाव : पाटोदे वडगाव येथे गुरूवारी पहाटे कडब्याच्या गंजीला अचानक आग लागल्याने एक हजार पेंढ्या जळून खाक झाल्या. यात शेतकऱ्याचे ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले तर जवळच दावणीला बांधलेले जनावरे बालंबाल बचावले.
यावर्षी शेतकरी भीषण दुष्काळाला तोंड देत असून, जनावरांच्या चारा पाण्यासाठी शेतकरी मैल-मैल भटकंती करून जनावरांना जगवीत आहे. सध्या कडब्याची पेंढी ४० रुपयांना झाली आहे. पाटोदे वडगाव येथील शेतकरी कल्याण शंकर आवारे यांनी जनावरांसाठी ४० हजार रुपये किंमतीच्या १ हजार कडब्याच्या पेंढ्या विकत घेतल्या होत्या.
गुरूवारी पहाटे या कडब्याच्या गंजीला अचानक आग लागून चारा जळून खाक झाला आहे. ही घटना शेजारील प्रभू घनवट यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दावणीला बांधलेली जनावरे सोडली. जनावरे बालंबाल बचावली. सकाळी बोकूड जळगाव येथील तलाठी सुनंदा खनके, ग्रामसेवक कैलास गायकवाड, सरपंच रामेश्वर लोखंडे, राजू आवारे यांनी पंचनामा केला.