छत्रपती संभाजीनगर : ब्राह्मण समाजातील मुला-मुलींनी हिंदूमध्ये आंतरजातीय विवाह करण्यास आमचा पाठिंबा आहे. यासाठी समाजात विचारमंथन सुरू आहे. भविष्यात आंतरजातीय विवाह सोहळा आयोजित करण्याचा मानस ब्राह्मण समन्वय समितीचे सचिव मंगेश पळसकर यांनी व्यक्त केला. भगवान विष्णूचा सहावा अवतार, भगवान परशुरामाचा जन्मोत्सव २९ एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत पळसकर यांनी आंतरजातीय विवाहाच्या मुद्यावर समन्वय समितीची भूमिका विषद केली.
भगवान परशुराम यांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. यामुळे जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात व शोभायात्रेत सकल ब्राह्मण समाजाबरोबरच हिंदूमधील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ब्राह्मण समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद दामोदरे यांनी केले. जन्मोत्सव समितीचे प्रकल्प प्रमुख सीएस लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी सांगितले की, जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिराचे नियोजन केले आहे. महिलांसाठी ‘राणी लक्ष्मीबाई टर्फ क्रिकेट लीग’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.
२५ रोजी सायंकाळी ५ वाजता समर्थ राम मंदिरात डाॅ. सविता मुळे यांचे नारदीय कीर्तन व २७ रोजी चित्तपावन ब्राह्मण मंडळाद्वारे उस्मानपुऱ्यातील श्रीनिधी हॉल येथे ‘जीवन इच्छापत्र- का व कशासाठी’ या विषयावर ॲड. महेंद्र एकबोटे यांचे व्याख्यान होणार आहे. तर २९ रोजी परशुराम जन्मोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता क्रांतीचौकातून वाहन रॅली निघेल व औरंगपुरा येथील भगवान परशुराम चौकात पूजन होईल. राजस्थानी विप्र मंडळाच्यावतीने समर्थ राम मंदिरात रक्तदान शिबिर होईल. त्याच दिवशी राजाबाजार येथून सायंकाळी ५ वाजता मुख्य शोभायात्रा निघेल. यात ५ ढोलपथक, चित्ररथ असणार आहे. या विविध कार्यक्रमात व शोभायात्रेत सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सुरेश देशपांडे यांनी केले. यावेळी संजय मांडे, धनंजय पांडे, आनंद तांदुळवाडीकर, सीए आर.बी. शर्मा, अनिल खंडाळकर, स्मिता आचार्य, विजया अवस्थी, अनुराधा पुराणिक, अतुल जोशी, अभिषेक कादी आदी पदाधिकारी हजर होते.
स्टार्टअपसाठी देणार बळब्राह्मण समाजातील युवकांना स्टार्टअपसाठी संपूर्ण मार्गदर्शन, तांत्रिक, आर्थिक बळ देण्यात येणार असल्याची घोषणा ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.